Home Breaking News दुर्गम हेडरीत आरोग्यसेवेचा नवा इतिहास; एलकेएएम रुग्णालयात पहिली वेदनारहित प्रसूती

दुर्गम हेडरीत आरोग्यसेवेचा नवा इतिहास; एलकेएएम रुग्णालयात पहिली वेदनारहित प्रसूती

23

दुर्गम हेडरीत आरोग्यसेवेचा नवा इतिहास; एलकेएएम रुग्णालयात पहिली वेदनारहित प्रसूती

४०० व्या सुरक्षित बाळाच्या जन्माचा टप्पा पूर्ण; आदिवासी भागातील मातांना मोठा दिलासा
अहेरी/गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागात आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलत असल्याचे समाधानकारक चित्र समोर आले आहे. हेदरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल (एलकेएएम) रुग्णालयाने आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जिल्ह्यातील पहिली ‘वेदनारहित सामान्य प्रसूती’ यशस्वीरीत्या पार पाडली आहे. याचवेळी रुग्णालयाने ४०० व्या सुरक्षित बाळाच्या जन्माचा महत्त्वपूर्ण टप्पाही गाठला आहे.
ग्रामीण भागात प्रसूतीदरम्यान होणाऱ्या तीव्र वेदना कमी करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसतात. मात्र एलकेएएम रुग्णालयाने ‘एपिड्युरल अ‍ॅनेस्थेशिया’ तंत्रज्ञानाचा वापर करून वेदनारहित प्रसूतीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या प्रक्रियेत प्रसूतीच्या कळा जाणवत नसल्या तरी माता पूर्ण शुद्धीत असते. विशेष म्हणजे ही प्रसूती कोणत्याही गुंतागुंतीशिवाय यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
या प्रक्रियेदरम्यान ‘वाय-फाय सक्षम सीटीजी मॉनिटरिंग’ तसेच ‘डिलेयड कॉर्ड क्लॅम्पिंग’ यांसारख्या जागतिक दर्जाच्या पद्धतींचा वापर करण्यात आला. त्यामुळे माता आणि बाळ दोघेही पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
दरम्यान, रुग्णालयाने ४०० व्या सुरक्षित प्रसूतीचा टप्पाही गाठला. गार्डेवाडा येथील १९ वर्षीय सविता टोप्पो या गर्भवती महिलेला उच्च-जोखीम गर्भधारणा असल्यामुळे गट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून तातडीने एलकेएएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या तज्ज्ञ पथकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ उपचार सुरू केले आणि १५ एप्रिल २०२६ रोजी तिच्या बाळाचा सुरक्षित जन्म झाला.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या ‘सर्वांसाठी सुलभ आरोग्यसेवा’ या संकल्पनेतून हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. तसेच लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनच्या संचालिका कीर्ती रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे दुर्गम भागातील नागरिकांना मोफत आणि उच्च दर्जाची आरोग्यसेवा दिली जात आहे.
हेदरीसारख्या दुर्गम भागात वेदनारहित प्रसूती आणि ४०० सुरक्षित जन्मांचा टप्पा गाठणे हे आरोग्यसेवेच्या दृष्टीने मोठे यश मानले जात असून अहेरी, एटापल्ली व भामरागड परिसरातील नागरिकांमध्ये रुग्णालयाविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Don`t copy text!