Home Breaking News गडचिरोलीचे एसपी नीलोत्पल यांची कोल्हापूरला बदली; एम. रमेश नवे पोलिस अधीक्षक

गडचिरोलीचे एसपी नीलोत्पल यांची कोल्हापूरला बदली; एम. रमेश नवे पोलिस अधीक्षक

267

 

गडचिरोलीचे एसपी नीलोत्पल यांची कोल्हापूरला बदली; एम. रमेश नवे पोलिस अधीक्षक

माओवादविरोधी मोहिमांमध्ये नीलोत्पल यांची धडाकेबाज कामगिरी; एम. रमेश यांच्याकडून अपेक्षा वाढल्या

गडचिरोली, ता. २० :

माओवादविरोधी कारवायांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश यांची जिल्ह्याच्या नव्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि माओवादी प्रभाव असलेल्या जिल्ह्यात कार्यरत असताना नीलोत्पल यांनी शांत स्वभाव, नियोजनबद्ध रणनीती आणि धडाकेबाज कारवायांमुळे वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी माओवाद्यांविरोधात अनेक यशस्वी मोहिमा राबवल्या. विशेष म्हणजे कुख्यात माओवादी नेता भूपतीसह अनेक जहाल माओवाद्यांना सरकारपुढे शरण येण्यास भाग पाडण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला.

त्यांच्या कार्यकाळात गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी हालचालींवर मोठ्या प्रमाणात आळा बसला. त्यामुळे जिल्ह्यातील सुरक्षेची परिस्थिती सुधारण्यास मदत झाली. नीलोत्पल यांच्या या कार्यकिर्दीची नोंद गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरेल, असे मत विविध स्तरातून व्यक्त होत आहे.

दरम्यान, गडचिरोलीचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले एम. रमेश आता जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. माओवादविरोधी कारवायांमध्ये त्यांनीही सक्रिय सहभाग घेतला असून स्थानिक परिस्थितीचा त्यांना चांगला अनुभव आहे.

नीलोत्पल यांच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या मोहिमा आणि धोरणे पुढेही प्रभावीपणे सुरू ठेवत जिल्ह्यातील शांतता आणि सुरक्षेला बळकटी देण्याची अपेक्षा नव्या पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

Don`t copy text!