Home Breaking News _*मोसम पाटा येथे ‘रस्ता रोको’ आंदोलन; ६ वर्षांपासून रखडलेल्या*_ 

_*मोसम पाटा येथे ‘रस्ता रोको’ आंदोलन; ६ वर्षांपासून रखडलेल्या*_ 

21

_*मोसम पाटा येथे ‘रस्ता रोको’ आंदोलन; ६ वर्षांपासून रखडलेल्या*_

 

*आलापल्ली–सिरोंचा महामार्गाविरोधात संताप, पावसाळ्यापूर्वी काम न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा*

 

 

आलापल्ली–सिरोंचा (NH 353C) या अत्यंत महत्त्वाच्या महामार्गाचे काम गेल्या सहा वर्षांपासून रखडल्याने संतप्त नागरिकांनी आज मोसम पाटा परिसरात सकाळपासून ‘रस्ता रोको’ आंदोलन छेडले. अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे प्रवासी, शालेय विद्यार्थी, रुग्ण तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने या आंदोलनाला व्यापक प्रतिसाद मिळाला.

 

मोसम पाटा येथे झालेल्या या आंदोलनात *सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी नेतृत्व केले, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज भाई शेख* यांनीही प्रत्यक्ष उपस्थित राहून आंदोलनाला जोरदार पाठिंबा दर्शविला. गावकरी नागरिक, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रखडलेल्या कामाबाबत प्रशासन व संबंधित कंत्राटदारांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अपूर्ण रस्त्यामुळे सतत अपघात होत असून अनेकांनी आपला जीव गमावला, तर अनेक जखमी झाले आहेत, हा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी ठळकपणे मांडला.

दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता *नायब तहसीलदार दत्ते साहेब* व *संबंधित रोड इंजिनियर* घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली.

यावेळी रोड इंजिनियर यांनी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन दिले. विशेषतः शालेय विद्यार्थी व रुग्णांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कामाला प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, आंदोलनकर्त्यांनी आश्वासनावर पूर्णपणे विश्वास न दर्शवता ठाम भूमिका घेतली आहे.

*“पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही, तर यापेक्षा अधिक व्यापक आणि तीव्र आंदोलन उभारण्यात येईल,”* असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. त्यांनी नागरिकांना एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढा देण्याचे आवाहनही केले.

 

या आंदोलनामुळे मोठा दबाव निर्माण झाला असून, आता प्रत्यक्षात कामाला गती मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर आश्वासनांची पूर्तता झाली नाही, तर येत्या काळात या प्रश्नावर आणखी उग्र आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Don`t copy text!