*मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढवावी*— काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मागणी
गडचिरोली :: गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मका पिकाची लागवड केली असून अनेक शेतकऱ्यांचे मका पीक सध्या काढणीवर आले आहे. जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अपेक्षेने शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्राकडे पाहत असताना मका विक्रीसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०२६ पर्यंत निश्चित केली होती. मात्र, नेटवर्क समस्या, सर्व्हर तांत्रिक बिघाड, संकेतस्थळ वारंवार बंद पडणे तसेच ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधेचा अभाव यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी वेळेत नोंदणी करू शकले नाहीत.
विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रक्रियेमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असून अनेक ठिकाणी महा-ई-सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. अनेक शेतकरी दिवसभर प्रतीक्षा करूनही नोंदणी करू शकले नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. परिणामी, शासनाच्या खरेदी प्रक्रियेपासून अनेक पात्र शेतकरी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनाकडे मका खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत वाढविण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना नोंदणीची संधी मिळावी तसेच कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी शासनाने तात्काळ निर्णय घेऊन मुदतवाढ जाहीर करावी, असे त्यांनी म्हटले आहे.






