Home Breaking News *उष्णतेच्या लाटेचा इशारा; कामगारांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली लागू – जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश*

*उष्णतेच्या लाटेचा इशारा; कामगारांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली लागू – जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश*

8

*उष्णतेच्या लाटेचा इशारा; कामगारांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली लागू – जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश*

 

गडचिरोली, (जिमाका) दि. ०४ : राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कामगार आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी तातडीच्या उपाययोजना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

प्रशासनाने जारी केलेल्या पत्रानुसार, बांधकाम, वीटभट्टी, खाणकाम आणि शेती क्षेत्रातील असंघटित कामगारांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून संबंधित विभागांनी यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

उष्णतेच्या तीव्रतेचा विचार करून कामाच्या वेळेत बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः दुपारच्या कडक उन्हात काम टाळून सकाळी लवकर किंवा सायंकाळच्या तुलनेने थंड वेळेत जड व कष्टाची कामे नियोजित करण्यास सांगण्यात आले आहे.

 

कामगारांच्या सुरक्षेसाठी कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामध्ये सावलीची व्यवस्था, थंड पिण्याचे पाणी, इलेक्ट्रोलाइट्स तसेच आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी ‘आईस पॅक’ची सोय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

उष्णतेमुळे कामगारांना त्रास होत असल्यास कामाचा वेग कमी करण्यास परवानगी देण्यात यावी, तसेच कामगारांनी गटांमध्ये काम करण्यावर भर देण्यात आला आहे. यामुळे एकमेकांवर लक्ष ठेवून आरोग्य समस्या तात्काळ ओळखता येणार आहेत.

 

जनजागृतीसाठी लेबर चौक आणि सार्वजनिक ठिकाणी उष्णतेच्या धोक्यांविषयी पोस्टर्स व बॅनर्सद्वारे माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय कामगारांच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर विशेष देखरेख यंत्रणा उभारण्यात आली असून संबंधित विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा तसेच उष्णतेशी संबंधित घटनांचा साप्ताहिक अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

नागरिकांनी, विशेषतः उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांनी स्वतःची काळजी घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Don`t copy text!