एसटीचा भोंगळ कारभार! तिकीट मशीन बंद पडल्याने बस तासभर रस्त्यात उभी; प्रवाशांचा संताप
ढवळी गावाजवळ खांबाडा बस थांबवली; अरेरावीच्या भाषेमुळे वातावरण तापले, आजाद समाज पार्टीचा आंदोलनाचा इशारा
गडचिरोली, दि. 07 मे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भोंगळ आणि निष्काळजी कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे. गडचिरोलीहून खांबाडाकडे जाणारी एसटी बस तिकीट काढण्याचे इलेक्ट्रॉनिक मशीन अचानक बंद पडल्याच्या कारणावरून धानोरा तालुक्यातील ढवळी गावाजवळ तब्बल एक तास रस्त्यातच उभी ठेवण्यात आली. या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून एसटी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 07) सकाळी सुमारे 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान गडचिरोलीवरून खांबाडाकडे जाणारी एसटी बस ढवळी गावाजवळ अचानक थांबवण्यात आली. बसमधील तिकीट काढण्याचे मशीन बंद पडल्याचे कारण देत चालक आणि वाहकांनी बस पुढे हलवण्यास नकार दिला. परिणामी महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, कर्मचारी तसेच इतर प्रवाशांना भर उन्हात रस्त्यावरच ताटकळत राहावे लागले.
बस का थांबवून ठेवली याबाबत प्रवाशांनी विचारणा केली असता संबंधित कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर देण्याऐवजी अरेरावीची व उद्धट भाषा वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रवाशांनी केला आहे. “बस इथून सोडणार नाही, जायचं असेल तर जा, नाहीतर जे बनतं ते करा,” अशा शब्दांत उत्तर देण्यात आल्याने प्रवाशांचा संताप अधिकच वाढला.
प्रवाशांच्या मते, तिकीट मशीन खराब होणे ही नवीन बाब नाही. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाकडे मॅन्युअल तिकीट देण्याची पर्यायी व्यवस्था असणे अपेक्षित होते. मात्र मशीन बंद पडल्याचे कारण देत संपूर्ण बसच रस्त्यात उभी करून प्रवाशांना वेठीस धरणे हा अत्यंत बेजबाबदार आणि अन्यायकारक प्रकार असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या घटनेमुळे वेळेवर कार्यालयात पोहोचणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामकाज विस्कळीत झाले, तर उपचारासाठी प्रवास करणाऱ्या रुग्णांनाही मोठा फटका बसला. काही प्रवाशांनी एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आपली महत्त्वाची कामे खोळंबल्याची नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर आजाद समाज पार्टीने तीव्र संताप व्यक्त करत एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर सडकून टीका केली आहे. प्रवाशांकडून तक्रार प्राप्त होताच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी तात्काळ संबंधित आगार प्रमुखांशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर संबंधित बस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
भविष्यात अशा प्रकारे प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या घटना पुन्हा घडल्यास आजाद समाज पार्टीच्या वतीने संबंधित एसटी डेपोसमोर तीव्र “हल्लाबोल आंदोलन” छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला आहे. सामान्य प्रवाशांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाविरोधात पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



