Home Breaking News *रामसागर येथे संशयित एचटीबीटी कापूस बियाण्यांवर धाड; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त*

*रामसागर येथे संशयित एचटीबीटी कापूस बियाण्यांवर धाड; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त*

16

*रामसागर येथे संशयित एचटीबीटी कापूस बियाण्यांवर धाड; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त*

 

*कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई; बियाणे कायद्यासह विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल*

 

गडचिरोली, (जिमाका) दि. १५ : चामोर्शी तालुक्यातील रामसागर येथे संशयित अनधिकृत एचटीबीटी (HTBT) कापूस बियाण्यांची अवैधरित्या साठवणूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत संशयित कापूस बियाण्यांची ३७ पाकिटे, सीलिंग मशीन तसेच कोरे पॅकेट असा एकूण ३५ हजार ४३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

दिनांक १४ मे २०२६ रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत कृषी विभागाच्या पथकाने सापळा रचून रामसागर येथील संशयित ठिकाणी छापा टाकला. यावेळी पुष्पा, बलवान व मालामाल या वाणांच्या संशयास्पद कापूस बियाण्यांची ३७ पाकिटे आढळून आली. यासोबतच बियाणे पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे सीलिंग मशीन आणि कोरे पॅकेटही जप्त करण्यात आले. जप्त बियाण्यांची किंमत ३३ हजार ९३७ रुपये असून सीलिंग मशीनची अंदाजे किंमत १ हजार ५०० रुपये असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

 

या प्रकरणी देवेंद्र सदाशिव वन्नेवार, रा. रामसागर यांच्या विरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) चेतन चलकलवार यांनी तक्रार दिली आहे. आरोपीविरुद्ध बियाणे कायदा १९६६, बियाणे नियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

 

सदर कारवाई जिल्हास्तरीय भरारी पथकाने स्थानिक गुन्हे शाखा आणि चामोर्शी पोलीस स्टेशनच्या सहकार्याने केली. कारवाईत मोहीम अधिकारी आनंद पाल, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम, कृषी अधिकारी चेतन चलकलवार तसेच पोलीस विभागाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. बनसोडे आणि पोलीस अंमलदार राहुल रामटेके यांनी सहभाग घेतला.

 

ही कारवाई कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, कृषी विकास अधिकारी किरण खोमणे तसेच तालुका कृषी अधिकारी अमित तुमडाम यांचे मार्गदर्शन लाभल्याचे कृषी विभागाने कळविले आहे.

Don`t copy text!