*जनगणना-२०२७ : १६ मे पासून घरयादी व घरगणना टप्पा राबविणार*
नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हा जनगणना अधिकारी आशिष वानखेडे
गडचिरोली, दि. १५ : जनगणना-२०२७ कार्यक्रमांतर्गत पहिला टप्पा म्हणजे घरयादी व घरगणना दिनांक १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या कामासाठी जिल्ह्यात प्रगणक व पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असून, नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे यांनी केले आहे.
जनगणना-२०२७ अंतर्गत घरांना क्रमांक देणे, घरयादी तयार करणे तसेच नागरिकांची प्राथमिक माहिती संकलित केली जाणार आहे. प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी भेट देऊन माहिती घेणार असून, प्रत्येक कुटुंबाने योग्य व अचूक माहिती देणे आवश्यक आहे.
या पहिल्या टप्प्यात संकलित होणारी माहिती राष्ट्रीय विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. देशातील लोकसंख्या, घरांची स्थिती, उपलब्ध मूलभूत सुविधा, सामाजिक व आर्थिक स्थिती यासंबंधी आवश्यक आकडेवारी उपलब्ध होऊन केंद्र व राज्य शासनाला विविध योजना आखण्यास व प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत होणार आहे.
प्रगणक व पर्यवेक्षकांना घरातील सदस्यांची माहिती, घराच्या वापराची माहिती, उपलब्ध सुविधा, पाणी, स्वच्छता, वीज, निवासाची स्थिती आदी बाबींविषयी माहिती संकलित करावी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता अधिकृत प्रगणकांना माहिती द्यावी.
जनगणना ही राष्ट्रीय कर्तव्याची प्रक्रिया असून, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.






