Home Breaking News *राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जिल्हाभर जनजागृती मोहिम*

*राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जिल्हाभर जनजागृती मोहिम*

8

*राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जिल्हाभर जनजागृती मोहिम*

 

*डेंग्यू रुग्णसंख्येत घट; नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे पाळाव्यात – डॉ. सुजिता वाडीवे*

 

गडचिरोली, (जिमाका) दि.19 : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १६ मे २०२६ रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन जिल्हाभर विविध जनजागृती उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. जिल्हा हिवताप कार्यालय, गडचिरोली यांच्या पुढाकाराने संपूर्ण मे महिनाभर डेंग्यू प्रतिबंध व जनजागृती अभियान राबविण्यात येत असून ग्रामीण व शहरी भागात विविध माध्यमांतून नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यात येत आहे.

 

डेंग्यू हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून त्याचा प्रसार एडीज इजिप्ती या डासामार्फत होतो. या डासांच्या पायांवर पांढरे पट्टे असल्याने त्यांना “टायगर मॉस्किटो” असेही संबोधले जाते. हे डास प्रामुख्याने दिवसा चावतात. स्वच्छ साचलेल्या पाण्यात या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पाण्याच्या टाक्या, कुलर, टायर, नारळाच्या करवंट्या, रिकामे डबे, बादल्या, कुंड्या आदी ठिकाणी पाणी साचू देऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

 

डेंग्यूची लक्षणे म्हणून तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायू व सांधेदुखी, उलट्या, नाकातून रक्तस्त्राव, रक्ताची उलटी आदी त्रास दिसून येऊ शकतात. गंभीर स्थितीत रुग्ण बेशुद्ध होण्याची किंवा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ताप आल्यास तात्काळ नजिकच्या आरोग्य केंद्रात जाऊन रक्त तपासणी करून उपचार घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. डेंग्यू निदानासाठी आवश्यक रक्त तपासणीची विनामूल्य सुविधा जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपलब्ध आहे.

 

जिल्ह्यात मागील वर्षी सन २०२५ मध्ये डेंग्यूसंदर्भात २ हजार १५८ रक्तजल नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी १२५ नमुने पॉझिटिव्ह आढळले होते. तर चालू वर्षात मे अखेरपर्यंत १५८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी केवळ ४ नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा डेंग्यू रुग्णसंख्येत घट दिसून येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. नागरिकांमध्ये सातत्याने करण्यात आलेली जनजागृती, स्वच्छता मोहिमा आणि माध्यमांद्वारे दिल्या जाणाऱ्या माहितीमुळे हे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

 

डेंग्यूपासून बचावासाठी नागरिकांनी संपूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावेत, लहान बालकांना दिवसा मच्छरदाणीत झोपवावे, LLIN किटकनाशकयुक्त मच्छरदाण्यांचा वापर करावा तसेच परिसर स्वच्छ ठेवून डासांची उत्पत्ती होणारी स्थाने नष्ट करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. घरातील पाण्याचे साठे दर आठवड्याला रिकामे करून स्वच्छ घासून कोरडे ठेवणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले.

 

पावसाळा सुरू झाल्यानंतर डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता लक्षात घेता मे महिन्यापासून जिल्ह्यात किटकनाशक फवारणी मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या पथकांना सहकार्य करून संपूर्ण घराची फवारणी करून घ्यावी व किटकजन्य आजारांपासून बचाव करावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुजिता वाडीवे यांनी केले आहे.

 

राष्ट्रीय डेंग्यू दिन कार्यक्रमास व्हीबीडी सल्लागार राजेश कार्लेकर, आरोग्य निरीक्षक प्रकाश बारसागडे तसेच जिल्हा हिवताप कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Don`t copy text!