Home Breaking News ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी औषध विक्रीची दुकाने राहणार बंद

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी औषध विक्रीची दुकाने राहणार बंद

7

ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी औषध विक्रीची दुकाने राहणार बंद

 

गडचिरोली, ता. १८ : बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री तसेच कॉर्पोरेट कंपन्यांकडून निर्माण करण्यात येणाऱ्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) बुधवार (ता. २०) देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक दिली आहे. ही माहिती गडचिरोली डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅंड ड्रगिस्ट असोसिएशने अध्यक्ष देवेंद्र सोमनकर व इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परीषदेत सोमवार (ता. १८) दिली.

या पत्रकार परीषदेला राजेश इटनकर, दीपक वैद्य, चंद्रभान जेनेकर, गायत्री सोमनकर, विपुल चन्नावार आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना पदाधिकारी म्हणाले की, औषध व्यवसाय हा Drugs and Cosmetics Act 1940 आणि Rule 1945 अंतर्गत चालविला जातो. मात्र ऑनलाइन औषध विक्रीबाबत अद्याप कायद्यात स्पष्ट तरतूद नसतानाही देशभरात सर्रासपणे बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री सुरू आहे. केंद्र शासनाने GSR 817(E) २८ ऑगस्ट २०१८ रोजी ऑनलाइन औषध विक्री संदर्भात अधिसूचना काढली होती, मात्र त्याचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असून न्यायालयाने ऑनलाइन औषध विक्रीला स्थगितीही दिली असल्याचे संघटनेने म्हटले आहे. कोरोना काळात सरकारने GSR 220(E) २६ मार्च २०२० अन्वये औषधांच्या होम डिलिव्हरीला विशेष परवानगी दिली होती. मात्र कोरोना संपून पाच वर्ष उलटल्यानंतरही ही अधिसूचना मागे घेण्यात आलेली नाही. याचाच फायदा घेत ऑनलाइन कंपन्या मोठ्या प्रमाणात सवलती देऊन औषध विक्री करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. Drug Price Control Order (DPCO) 2013 अंतर्गत नियंत्रित औषधांवर घाऊक विक्रेत्यांना ८ टक्के आणि किरकोळ विक्रेत्यांना १६ टक्के नफा निश्चित करण्यात आला आहे. तर अनियंत्रित औषधांवर अनुक्रमे १० टक्के आणि २० टक्के नफा दिला जातो. मात्र कॉर्पोरेट कंपन्या २० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत देऊन अव्यावसायिक स्पर्धा निर्माण करत आहेत. त्यामुळे देशातील सुमारे १२.५० लाख औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आला असून ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.औषध विक्रेत्यांना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या पर्यायी ब्रँडची औषधे देण्याचा अधिकार मिळाल्यास ते या स्पर्धेला सक्षमपणे सामोरे जाऊ शकतील, अशी मागणीही संघटनेने केली आहे. संघटनेने संबंधित केंद्रीय मंत्री, प्रशासकीय अधिकारी तसेच पंतप्रधानांना वारंवार निवेदने देऊनही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. गडचिरोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननेही या बंदला पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पत्रकार परीषदेत करण्यात आले. या बंदची सुरूवात मूकमोर्चाने होणार आहे. हा मोर्चा बुधवारी सकाळी ११ वाजता स्थानिक केमिस्ट भवन येथून होणार आहे, अशी माहितीही पत्रकार परीषदेत देण्यात आली. औषधांची आॅनलाइन विक्री होत असल्याने अनेक नागरिक डाॅक्टरांच्या पिस्क्रिप्शनशिवाय औषधे मागवतात. काही औषधांमध्ये त्या औषधांचा कुठलाही घटक नसल्याचे किंवा औषधेच बनावट असल्याचेही निदर्शनास आले आहे. शिवाय ज्या औषधांचे व्यसन लागू शकते किंवा ज्याचा वापर नशेसाठी होऊ शकतो, अशी औषधेसुद्धा आॅनलाइन विकण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद असल्यामुळे औषध विक्रीची दुकाने बुधवारी बंद राहणार आहे. मात्र अत्यवस्थ अवस्थेतील रुग्ण, गंभीर आजारी व्यक्ती किंवा आपात्कालीन परीस्थितीत औषधांची आवश्यकता असल्यास संघटनेने काही मोबाईल क्रमांक जाहिर केले आहेत. औषधांची आवश्यकता असल्यास देवेंद्र सोमनकर (गडचिरोली)- ९४०४१२५९२६, सिकंदर चौधरी ( वडसा) – ८९९९३६२८४४३, मनोज पत्तीवार (आल्लापली)- ९४२१७२९३८४, प्रकाश दत्ता (मुलचेरा)- ९४२१८५४८१९, चंद्रशेखर बुद्धे (देलनवाडी)- ९४२३४२३५१३, संदीप रायर्लावार ( सिरोंचा)- ९४२१७२९६७१, विपुल चन्नावार ( गडचिरोली)-९४२३४२२१३०, रुपेश सकिनलावार (गडचिरोली)- ९४२०७५८८३४, चेतन निपाने ( कुरखेडा)- ९४०४८३१३३२, जयश्री पुंडे ( गडचिरोली)- ७०२०३४१२७०, ९४०५१३२८२२, मनिष येमुलवार (भामरागड)- ९४०४४३८३८३, प्रवीण येगोलपवार (अहेरी)- ९८३४३१२८३३, विश्वजीत हलधर (धानोरा) – ७५८८७७२७४३, अश्विन भांडारकर ( कुरुड) – ८९७५६१९२००, अजय आकुलवार (असरअल्ली)- ९४२३७४३३२७, ९४२१७२९६७१, संतोष धकाते (आरमोरी) – ९४२०९७३६८०, जितेन्द्र निमसरकार (आष्टी)- ९२८४९७५३३९, संतोष गंधेशिरवार (एटापल्ली) -९४०३११६९४०, दिनेश जुवारे, भेंडाळा (चामोर्शी)- ९५८८६७८२४ या क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहिती पत्रकार परीषदेत देण्यात आली.

———————————

Don`t copy text!