गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी एड. विश्वजीत कोवासे यांची नियुक्ती
गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील जिल्हाध्यक्षांची नवीन यादी जाहीर केली असून, गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी अॅड. विश्वजीत कोवासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अॅड. विश्वजीत कोवासे हे जिल्ह्यातील सक्रिय व अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. सामाजिक, राजकीय तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस संघटनेला बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात संघटन मजबूत करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात असून, त्याचाच भाग म्हणून ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नेतृत्वाने पक्ष संघटन वाढीसाठी काम केले असून, आता अॅड. विश्वजीत कोवासे यांच्या नेतृत्वात काँग्रेस नव्या जोमाने कार्य करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.






