भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनो भूसंपादनाविरोधात आक्षेप सादर करा ; अन्यथा भवितव्य धोक्यात
डाव्या लोकशाही पक्षांचे आवाहन
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू केलेली आहे. यानुसार भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी चामोर्शी यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कलम ३२ (२) अन्वये खातेदारांना नोटीस बजावलेली आहे. त्यामुळे केवळ आंदोलन – मोर्चाच्या भ्रमात न राहता ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनी वाचवायच्या आहेत त्यांनी विहित मुदतीत सदर नोटीसावर लेखी आक्षेप सादर करुन शेत जमिनी देण्यासाठी विरोध करावा असे आवाहन डाव्या लोकशाही पक्षांनी केले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भेंडाळ्यात कोणत्याही परिस्थितीत जिंदाल स्टील कारखान्यासाठी जमीनींचे भूसंपादन करायचेच अशी शासनाची भूमिका आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना संभ्रमात टाकून जमीनीच्या भूसंपादनाचे काम सुरू केले आहे. मात्र शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनी या प्रकल्पासाठी द्यायच्या नसल्याने विरोध करीत आहेत. या विरोधाला हाणून पाडण्यासाठी आता कंपनी आणि सत्ताधारी लोकांकडून शेतकऱ्यांना भ्रमीत करण्याचे काम करण्यात येत असून भूसंपादन अधिकाऱ्यांनी कलम ३२(२) नुसार बजावलेल्या नोटिसीला शेतकऱ्यांनी उत्तर देवू नये यासाठी सत्ताधारी आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसलेले तथाकथित कार्यकर्ते शेतकऱ्यांना भ्रमीस्ट करण्याचे काम करीत आहेत. शेतकऱ्यांनी सदर नोटीसावर लेखी आक्षेप सादर केले नाही तर शेती वाचवण्यासाठी भविष्यात न्यायालयीन संघर्ष करायचे असल्यास आडकाठी निर्माण होवू शकते. त्यामुळे एमआयडीसीच्या भूसंपादनाच्या कचाट्यातून आपल्या जमीनी वाचवू इच्छीणाऱ्या शेतकऱ्यांनी जमीनीच्या भूसंपादनाचा स्पष्ट विरोध करावा. या आक्षेपपत्रात कोणत्याही परिस्थितीत आम्हाला वाढीव दर द्यावा, शेतकऱ्यांशी चर्चा करावी, प्रकल्पात नोकरी द्यावी अशी मागणी करु नये.
तसेच कंपनीसाठी काम करणारे राजकीय कार्यकर्ते शेतकऱ्यांना फसविण्यासाठी भ्रमीत व द्विधा निर्माण होणारे दर द्या, नोकरी द्या असा उल्लेख असलेले आक्षेप सादर करण्याच्या प्रयत्नात असून अशा लोकांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन डाव्या लोकशाही आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ.अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केले आहे.








