Home Breaking News *खेत बचाव अभियानांतर्गत कढोली येथे किसान गोष्टी कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*खेत बचाव अभियानांतर्गत कढोली येथे किसान गोष्टी कार्यक्रम उत्साहात संपन्न*

21

*खेत बचाव अभियानांतर्गत कढोली येथे किसान गोष्टी कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*नैसर्गिक शेती, सेंद्रिय खतांचा वापर व खरीपपूर्व नियोजनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन*

गडचिरोली, दि. 4 : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा कढोली, तालुका चामोर्शी येथे आज खेत बचाव अभियान आणि खरीपपूर्व हंगाम किसान गोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती पद्धती, हवामान बदलाचा शेतीवरील परिणाम तसेच आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक नियोजन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) श्रीमती प्रीती हिरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात अल निनो परिस्थितीचा शेतीवर होणारा परिणाम, पिकांचे संरक्षण आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमात नैसर्गिक शेतीतील विविध घटकांची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. यामध्ये हिरवळीचे खत, अझोला वापर, जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क आदींची निर्मिती व उपयोग याविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.

श्रीमती प्रीती हिरळकर यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाच्या आधारे पीक नियोजन करण्याचा सल्ला दिला. फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, पीक व्यवस्थापन तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली. ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण लक्षात घेऊन महिला शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ) स्थापन करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी श्री अमित तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी श्री बाळू डोंगरे, उपकृषी अधिकारी श्री सुनील यचवाड, सहायक कृषी अधिकारी श्री गणेश सोमनकर, बीटीएम श्री जे. एच. जिरितकर, कृषी सखी श्रीमती शैला देशमुख व श्रीमती रंजना बावणे यांची उपस्थिती होती.

यावेळी कढोली परिसरातील महिला शेतकरी गटातील मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या.

Don`t copy text!