Home Breaking News भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; एकाचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर जखमी

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; एकाचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर जखमी

33

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; एकाचा जागीच मृत्यू, तरुण गंभीर जखमी

आष्टी फॉरेस्ट नाक्याजवळ हृदयद्रावक अपघात; ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

 

आष्टी (गडचिरोली), प्रतिनिधी :

आष्टी फॉरेस्ट नाक्याजवळ गुरुवारी (दि. ४ जून) सायंकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, चिरंजिव प्रदीप मिस्त्री (वय २२, रा. कालीनगर, ता. मुलचेरा) व त्याचा मित्र विशाल गोपाल सरकार हे दुचाकी क्रमांक एमएच-३३ एजी-८२४५ ने चंद्रपूरहून कालीनगरकडे जात होते. सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास मौजा आष्टी फॉरेस्ट नाक्याजवळ रस्त्यावर ट्रकची गर्दी असल्याने प्रदीप मिस्त्री यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला.

याचवेळी मागून येणारा ट्रक क्रमांक एमएच-४० सीटी-७६३७ चा चालक हरिओम गोपाल सिंह (वय ४५, रा. बिसलपूर, ता. खेरागड, जि. आग्रा, उत्तर प्रदेश) याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की दुचाकीवरील विशाल गोपाल सरकार यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रदीप मिस्त्री गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. फिर्यादी प्रदीप मिस्त्री यांच्या तक्रारीवरून आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक १५६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), १२५(अ) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये ट्रक चालक हरिओम गोपाल सिंह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश पोतराजवार करीत असून अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

Don`t copy text!