*गडचिरोलीत १०० टक्के नियमित लसीकरणावर भर; अतिसारमुक्त जिल्ह्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे: जिल्हाधिकारी*
*बालमृत्यू शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट; शुद्ध पाणीपुरवठा, वेळीच उपचार आणि जनजागृतीला प्राधान्य*
गडचिरोली, (जिमाका) दि. १२ : जिल्ह्यातील एकही बालक नियमित लसीकरणापासून वंचित राहू नये. बालमृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी १०० टक्के नियमित लसीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत नियमित लसीकरण, ‘स्टॉप अतिसार मोहीम-२०२६’ तसेच एचपीव्ही लसीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. पंडा म्हणाले की, पावसाळ्याच्या काळात अतिसाराचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता यंत्रणांनी अधिक दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यात सर्वत्र शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नियमित पाणी नमुना तपासणी, जलस्रोतांचे निर्जंतुकीकरण आणि पाणी शुद्धीकरण प्रक्रियेवर विशेष भर द्यावा. अतिसार प्रतिबंधासाठी उपचारांबरोबरच दूषित पाण्याचा पुरवठा रोखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी मोहिमेची सविस्तर माहिती देताना सांगितले की, अतिसारामुळे होणारा एकही बालमृत्यू खपवून घेतला जाणार नाही. क्षेत्रात आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाला तातडीने उपचार व आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना सर्व आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १ ते १५ जून या कालावधीत पूर्वतयारी व सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) पूर्ण करण्यात येत असून, १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत मोहिमेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व अंगणवाड्यांमध्ये ‘ओआरएस-झिंक कॉर्नर’ स्थापन करण्यात आले असून आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. दुर्गम पाडे, वीटभट्ट्या तसेच अतिजोखीम क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अतिसार नियंत्रण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागासोबत महिला व बाल विकास, शिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. ग्राम आरोग्य, पोषण व स्वच्छता दिनाच्या माध्यमातून मातांचे समुपदेशन, शाळा व अंगणवाड्यांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक, स्वच्छतेबाबत जनजागृती तसेच उघड्यावर शौचास प्रतिबंध या बाबींवर विशेष भर देण्यात येणार आहे.
बैठकीस प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप किरंगे, साथरोग अधिकारी डॉ. रुपेश पेंदाम तसेच शिक्षण, महिला व बाल विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.
घोषवाक्य : “अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएसची घेऊनी साथ.”






