बुलढाण्यात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न मतदारसंघात खळबळ

109

बुलढाणा, २६ मे:-कोरोना आपत्तीत निरनिराळी वक्तव्य करून चर्चेत आलेले शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी घरासमोर जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांच्या घरासमोर त्यांची 4 चाकी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी नेहमी प्रमाणे आपली गाडी इनोव्हा कार घरासमोर उभी केली होती.मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तींनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या आगीत गाडीच्या मागील भागाने नुकसान झाले आहे. ही घटना घडली तेव्हा आमदार संजय गायकवाड हे घरी नव्हते. कामानिमिताने संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते.याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रकाराने खळबळ माजली आहे.

माझी गाडी जाळून मोठा स्फोट घडविण्याचा कट असल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला आहे. तसंच, राजकीय वादातून हा हल्ला करण्याचा प्रयत्न असावा असा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील. डॉग स्कॉडला देखील पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.