कुणबी समाजाच्या विराट मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, तेली,माळी संघटनेचा पाठिंबा

79

कुणबी समाजाच्या विराट मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, तेली,माळी संघटनेचा पाठिंबा

 

 

गडचिरोली, ता. ५: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये आणि जातनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागण्यांसाठी हजारो कुणबी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

 

शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणातून निघालेला हा मोर्चा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. बिहारच्या धर्तीवर राज्यात सर्व जातींची जातनिहाय जनगणना करावी,गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे वर्ग ३ व ४ च्या नोकर भरतीतील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व बाह्य यंत्रणेमार्फत नोकरभरतीचा शासननिर्णय तत्काळ रद्द करावा आदी दहा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठवण्यात आले.

 

या मोर्चात वरोरा-भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर, राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे, आरमोरीचे आ.कृष्णा गजबे, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, माजी मंत्री परिणय फुके, माजी आमदार आनंदराव गेडाम, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.नामदेव किरसान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्यासह विविध राजकीय पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.या मोर्चाला तेली समाज संघटना, माळी समाज संघटना तसेच अन्य संघटनांनी पाठिंबा दिला होता.

 

मोर्चा निघण्यापूर्वी काही युवकांनी उपस्थितांना संबोधित केले. विशेष म्हणजे, राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींना नेतृत्वाची संधी न देता समाजबांधवच मोर्चाचे सारथी झाले होते. मोर्चादरम्यान गडचिरोली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता