‘ त्या ‘शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्यावा – संतोष सुरावार
माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना निवेदन
चामोर्शी :
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी
नियुक्त झालेल्या व त्या दिनांकानंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त झालेल्या अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यावरील शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी दिली.
१ नोव्हेंबर २००५ पूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार राज्य
सरकारी सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्याचा गुरुवारी (दि.४ जानेवारी) घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचे शिक्षक परिषदेच्या वतीने स्वागत करुन राज्य सरकारचे आभार मानण्यात आले आहे.
नुकतेच घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर या १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या व १ नोव्हेंबर २००५ नंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त झालेल्या अंशतः अनुदानित शाळा व तुकड्यांवरील शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळात निर्णय घेऊन शिक्षक, कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करणे आवश्यक असल्याचे गाणार यांनी निवेदनात म्हंटले आहे.