दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक
नवी दिल्ली — दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आली. आज संध्याकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरी काहीवेळ तपास केला. त्यानंतर साधारण दोन तासांनी ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना अटक केली. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी दाखल होताच निवासस्थानाबाहेर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दोन तासाच्या चौकशीनंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यांना अटक करण्यापूर्वी ईडी कार्यालयाच्या बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. केजरीवाल यांची ईडी हेडक्वार्टर मध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. याबरोबरच ईडी कार्यालयाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी त्यांच्या अटकेनंतर मोदी सरकारवर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की केजरीवाल यांना अशा पद्धतीने लक्ष करणे चुकीचे असून असंवैधानिक आहे. राजकारणाचा स्तर घसरणे हे प्रधानमंत्री पदाला व सरकारला शोभणारे नाही. विरोधकांना निवडणूक रिंगणात उतरून विरोध करणे त्यांच्यावर टीका करणे ही खरी लोकशाही आहे. सीबीआय, ईडी यासारख्या संस्थावर दबाव टाकून मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी करणार लाजिरवाणं कृत्य भारताच्या इतिहासात पहिल्यांदा घडत आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या अटकेमुळे खळबळ माजली आहे.