कोंढाळा येथील इसमाचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू…
– देसाईगंज तालुक्यातील घटना…
देसाईगंज :- आंबे तोडण्यासाठी गेलेल्या एका ६४ वर्षीय इसमाचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक- २० मे रोजी देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे घडली.तुळशीदास शेंडे असे मृताचे नाव आहे.
सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तुळशीदास शेंडे व इतर दोघेजण शेतावर आंबे तोडण्यासाठी गेले होते.तुळशीदास हे आंबे तोडण्यासाठी झाडावर चढले असता; झाडावरून पाय घसरून पडले.त्यात त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव तसेच शरीरावर जबर मार लागल्याने जखमी झाले.जखमी अवस्थेत त्यांना सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घरी आणण्यात आले.त्यानंतर तुळशीदास यांचे स्वास्थ्य बिघडू लागल्याने त्यांना उपचाराकरिता देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर उपचार करतेवेळी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान तुळशीदास शेंडे यांची प्राणज्योत रुग्णालयातच मावळली.तुळशीदास यांच्या पश्चात मुलगा,सून, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.तुळशीदास शेंडे यांच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे.