_*नवेगाव खुर्द येथील मामा तलावाची फुटलेली पाळ तातडीने दुरुस्त करा*_
_*माजी जि.प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांची मागणी*_
ब्रम्हपुरी | प्रतिनिधी
_ब्रम्हपुरी तालुक्यातील मौजा नवेगाव खुर्द येथील मामा तलावाची मागील वर्षी अतिवृष्टीमुळे फुटलेली पाळ तातडीने दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे._
_नवेगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांसाठी मामा तलाव हा अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत आहे. जून-जुलै २०२५ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. दिनांक २८ जुलै रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास तलावाच्या मध्यभागातील पाळ फुटल्याने अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडले होते. या पाण्यामुळे नवेगाव खुर्द तसेच मेंडकी परिसरातील शेतांमध्ये जलभराव निर्माण झाला होता. सुमारे २५ एकरांहून अधिक क्षेत्रातील धान पीक पूर्णतः नष्ट झाले होते. तसेच तलावातील मत्स्य व्यवसायालाही मोठा फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले असून लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते. याशिवाय तलावाची पाळ फुटल्यानंतर तलावात पाणी साठवण न झाल्याने उर्वरित शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी पाण्याअभावी अडचणींचा सामना करावा लागला. परिणामी अनेक शेतकऱ्यांना उत्पादन घेणे कठीण झाले होते._
_घटनेला जवळपास नऊ महिने उलटून गेले असतानाही अद्याप तलावाच्या पाळीच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. आता एप्रिल महिना संपत आला असून पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे पुन्हा अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी शेती हंगाम सुरू होण्यापूर्वीच मामा तलावाच्या फुटलेल्या पाळीचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी केली आहे._
_सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी पुढाकार घेणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या प्रमोदभाऊ चिमुरकर यांच्या या मागणीमुळे नवेगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे._









