Home Breaking News *घरकुल धारकांना रेतीचा तुटवडा, सरकारी कामांसाठी रेतीचे ढीग!* 

*घरकुल धारकांना रेतीचा तुटवडा, सरकारी कामांसाठी रेतीचे ढीग!* 

77

*घरकुल धारकांना रेतीचा तुटवडा, सरकारी कामांसाठी रेतीचे ढीग!*

 

_बड्या ठेकेदारांसाठी सवलती, गरिबांना फक्त आश्वासने_

__________________________________

 

*एटापल्ली*

 

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुका सध्या अन्यायकारक धोरणांमुळे उद्रेकाच्या उंबरठ्यावर आहे. सरकारच्या घरकुल योजनेतून मिळालेल्या घरांसाठी आवश्यक असलेल्या रेतीसाठी लाभार्थ्यांना महिनोंमहिने वणवण करावी लागत आहे. दुसरीकडे, सरकारी आणि खासगी इमारतींच्या बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणावर रेतीचा वापर होतो आहे. या विरोधाभासामुळे सामान्य जनतेत रोष निर्माण झाला आहे.

 

 

एटापल्ली तालुक्यात एकाही रेती घाटाचा अधिकृत लिलाव झालेला नाही. मात्र, सरकारी प्रकल्पांसह ठेकेदारांकडून मोठ्या इमारती उभ्या राहतात, आणि त्यासाठी लागणारी रेती कुठून येते, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याचवेळी गरिबांसाठी असलेल्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मात्र अडवणूक केली जाते.

 

घरकुलासाठी आवश्यक साहित्याच्या तुटवड्यामुळे गरीब लाभार्थ्यांचे स्वप्न भंगत आहे. “घरकुलासाठी रेती नाही, परंतु बड्या प्रकल्पांसाठी काहीही चालते” असे स्पष्ट चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळते. लाभार्थ्यांकडून वारंवार अर्ज करूनही त्यांना अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवीच मिळते. त्यामुळे

अनेकांच्या घरांचे बांधकाम अर्धवट राहिले आहे.

 

रेती घाटांचा लिलावच झालेला नसताना तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर रेती कशी येते? आणि ती केवळ बड्या ठेकेदारांपर्यंतच कशी पोहोचते? प्रशासनाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. लाभार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याऐवजी अधिकारी मात्र निष्क्रीय असल्याचा आरोप होत आहे.

 

तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी या अन्यायाला तोंड देण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. गरीब लाभार्थ्यांच्या हक्कांची गळचेपी होत असेल, तर प्रशासनाला जबाबदार धरले पाहिजे. “गरिबांसाठी सरकारचे धोरण फक्त कागदावरच राहणार की प्रत्यक्षात उतरवले जाणार?” हा प्रश्न आता प्रत्येकाला विचारन्याची वेळ आली आहे.

Don`t copy text!