भामरागड आणि छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथक सी ६० दलातील एक जवान शहीद

51

भामरागड आणि छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथक सी ६० दलातील एक जवान शहीद

 

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड आणि छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी पथक सी ६० दलातील एक जवान शहीद झाला. आज, मंगळवारी दिरंगी-फुलणार जंगल परिसरात ही चकमक झाली. महेश नागुलवार (३९, रा. अनखोडा) असे शहीद जवानाचे नाव आहे.

छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलणार या गावांतील जंगल परिसरात गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांनी तळ ठोकला होता. ही माहिती प्राप्त होताच गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी सी ६० चे १८ पथक आणि सीआरपीएफच्या दोन पथकाच्या जवानांनी १० जानेवारीला या परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबवली होती. आज या परिसराला जवानांनी घेराव घातला असता लपून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमकीदरम्यान गडचिरोली सी ६० पथकाचा जवान महेश नागुलवार याला गोळी लागली. हेलिकॉप्टरने उपाचारासाठी नेण्यात येत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.चकमक परिसर घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नक्षलवाद्यांशी लढा दिला.

चामोर्शी तालुक्यातील अनखोडा गावातील रहिवासी असून महेशच्या निधनामुळे मुलींचे पितृछत्र हरविले असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.