बाल स्नेही पंचायत स्थापन करण्याच्या उद्देशाने तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न
चामोर्शी: मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या वतीने दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी तालुका स्तरीय ग्रामपंचायत सदस्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली. बाल स्नेही पंचायत स्थापन करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच व सदस्यांसाठी ही एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत एकूण 53 सहभागींनी उपस्थिती दर्शविली.
ही कार्यशाळा शिक्षक पतसंस्था सभागृह, चामोर्शी येथे संपन्न झाली. कार्यशाळेला बालविकास प्रकल्प अधिकारी हटकर साहेब, विस्तार अधिकारी भांडेकर साहेब, आरोग्य विभागाचे समुपदेशक घ्यार साहेब तसेच मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनचे जिल्हा प्रशिक्षक अधिकारी संदीप राऊत साहेब उपस्थित होते.
कार्यशाळेचे संचालन सोनाली रणदिवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन हर्षाली खारकर यांनी मानले. प्रशिक्षणाचे मार्गदर्शन तालुका समन्वयक दिनेश कामतवार व योगिता सातपुते यांनी केले. कार्यशाळेदरम्यान बाल हक्क, बाल संरक्षण, आरोग्य, शिक्षण, पोषण आहार आणि बालविकास यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्या पल्लवी, अश्विनी, पंकज, भीमराव, धीरज आणि राजेश्वर यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर कार्यक्रम मॅजिक बसचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे आणि संदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
सहभागी सदस्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व आपल्या गावांमध्ये बाल स्नेही पंचायत संकल्पना प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.