Home Breaking News *सेमल लाकडाच्या तस्करीची चकित करणारी कहाणी*   _– ट्रक जप्तीच्या घटनेवर संशयाची...

*सेमल लाकडाच्या तस्करीची चकित करणारी कहाणी*   _– ट्रक जप्तीच्या घटनेवर संशयाची सावली_

79

*सेमल लाकडाच्या तस्करीची चकित करणारी कहाणी*

_– ट्रक जप्तीच्या घटनेवर संशयाची सावली_

 

 

गडचिरोली जिल्ह्यात जंगलतोड आणि लाकडतस्करीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. वन विभाग मोठमोठ्या दाव्या करतो, मात्र प्रत्यक्षात तस्कर निर्धास्तपणे जंगल साफ करत आहेत. 12 मार्च 2025 रोजी एटापल्ली येथे घडलेली एक घटना याचे ज्वलंत उदाहरण आहे.

 

या दिवशी वन विभागाने जिजावंडी गावाजवळ मोठ्या प्रमाणात सेमल लाकूड असलेला ट्रक पकडल्याचा दावा केला. हा ट्रक एटापल्लीच्या वन परिक्षेत्र कार्यालयात आणण्याचे ठरले. मात्र, ट्रक वाटेतच बिघडला आणि वन विभागाने तो तसाच सोडून दिला. कर्मचाऱ्यांनी जवळच्या पिपली बुर्गी गावी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत आले, तर ट्रक गायब झाला!

 

ही घटना हास्यास्पद आहे. वन विभागाचे कर्मचारी जंगल राखण्याऐवजी तस्करांना मदत करत आहेत का, हा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे. ट्रक जप्त करण्याचे नाटक करण्यात आले का? की तस्करांसोबत आधीच काहीतरी ‘डील’ झाली होती? ज्या पद्धतीने हा ट्रक जप्तीचा सगळा प्रकार घडला, त्यावर कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही.

 

जिजावंडी हे छोटे गाव असून छत्तीसगडच्या सीमेजवळ आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, ट्रक नादुरुस्त झाला, हा फक्त एक बहाणा आहे. प्रत्यक्षात तस्करांना वेळ मिळावा म्हणून हा खेळ रचला गेला. रात्रीच्या वेळी छत्तीसगडहून मेकॅनिक आला, ट्रक ताबडतोब दुरुस्त झाला आणि तो जंगलातून सरळ बाहेर काढण्यात आला. एवढा मोठा प्रकार होत असताना वन विभागाला काहीच कळले नाही, हे कोणत्याही सामान्य माणसाला पचण्यासारखे नाही.

 

याचा सरळ अर्थ असा की, ट्रक तस्करांकडून परत मिळावा म्हणूनच वन विभागाने तो “बिघडला” असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तस्कर आणि वन विभागाचे काही अधिकारी यांच्यात आधीच सगळं ठरलेलं होतं. त्यामुळेच ट्रक जप्त करण्याचे नाटक केले आहे

 

हा प्रकार म्हणजे जंगलाच्या विनाशाची स्क्रिप्ट वन विभागाने स्वतः लिहिल्यासारखे आहे. ज्या अधिकाऱ्यांनी हा ट्रक ताब्यात घेतला, त्यांनी त्याला योग्य ती सुरक्षा का दिली नाही? पकडलेला ट्रक रात्रभर खुल्या जागेत सोडून दिला जाणे म्हणजे तस्करांना उघड उघड संधी देण्यासारखेच आहे.

 

गडचिरोलीतील जंगलतोडीच्या घटना पाहता, ही एक साखळी असल्याचे स्पष्ट होते. दिवसाढवळ्या हजारो झाडे तोडली जातात, संपूर्ण ट्रक भरून लाकूड बाहेर पाठवले जाते, पण वन विभाग काहीही करत नाही. यामागे कायदेशीररित्या संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांचा हात आहे का?

 

या प्रकारानंतर गडचिरोलीतील नागरिक संतप्त आहेत. जर हा प्रकार खरोखरच वन विभागाने निष्काळजीपणाने केला असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. परंतु, जर हा एक सखेत डाव असेल, तर यात संपूर्ण यंत्रणाच गुंतलेली आहे.

 

सरकार लाखो झाडे लावण्याच्या घोषणा करत असते, पण दुसरीकडे वन विभागाचे कर्मचारीच जंगल नष्ट होण्यासाठी मोकळे रान देत असतील, तर या सगळ्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. हा प्रकार म्हणजे एका भ्रष्ट व्यवस्थेचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली नाही, तर भविष्यात गडचिरोलीतील जंगल संपलेच म्हणून समजा.

 

 

 

*एक जागृत पर्यावरण प्रेमी*

Don`t copy text!