*अहेरी आगाराला मिळाल्या 30 नव्या बसगाड्या,विद्यार्थ्यांसह नागरिकांची सोय*

49

*अहेरी आगाराला मिळाल्या 30 नव्या बसगाड्या,विद्यार्थ्यांसह नागरिकांची सोय*

आ.धर्मरावबाबा आत्राम यांचा पुढाकार

 

*अहेरी:* भंगार बसगाड्यांमुळे चर्चेत आलेल्या एसटी महामंडळाच्या अहेरी आगाराला अखेर 30 नव्याकोऱ्या बसगाड्या मिळाल्या आहेत. त्यातील 25 बस विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या मानव विकास मिशनच्या तर 5 लालपरी आहेत. विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांच्यासह राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत या बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.

 

अहेरी आगारातील बसगाड्यांचा विषय आ.धर्मरावबाबा यांनी शासनदरबारी मांडला होता. याशिवाय 1 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यात धर्मरावबाबांच्या मार्गदर्शनात तनुश्री आत्राम यांनी अहेरी आणि गडचिरोली आगारातील बसगाड्यांचा विषय त्यांच्यापुढे मांडला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी लवकरच अहेरी व गडचिरोली आगाराला नवीन बसेस देण्याचे मान्य केले होते. त्याची फलश्रुती आता होऊन अहेरीआगाराला 30 नवीन बस मिळाल्या आहेत.

 

अहेरी विधानसभा क्षेत्रात एकूण पाच तालुके असून दळणवळणाचा मुख्य साधनांपैकी एसटी ही सर्वसामान्य, गरीब लोकांसाठी महत्वपूर्ण आहे. परंतु अनेक वर्षापासून पुरेशा बस नसल्याने आणि असलेल्या बसगाड्या खिळखिळ्या झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पण आता नागरीकांचा प्रवास सुकर होणार आहे.

 

बसगाड्यांच्या लोकार्पण कार्यक्रमाला अहेरी आगाराचे व्यवस्थापक घागरगुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नागेश मडावी, विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, सेवानिवृत्त प्राचार्य रतन दुर्गे, याशिवाय एसटीचे चंदनकर, दोडके, लोखंडे व आगारातील चालक-वाहक तथा यांत्रिक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.