Home Breaking News *गडचिरोली शहरात हत्तीचा आगमन ;आता तरी हत्तींचा बंदोबस्त करणार का पालकमंत्री फडणवीस...

*गडचिरोली शहरात हत्तीचा आगमन ;आता तरी हत्तींचा बंदोबस्त करणार का पालकमंत्री फडणवीस साहेब- काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा संवाल*

75

*गडचिरोली शहरात हत्तीचा आगमन ;आता तरी हत्तींचा बंदोबस्त करणार का पालकमंत्री फडणवीस साहेब- काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा संवाल*

 

गडचिरोली, दि. २५ मे २०२५:

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून रानटी हत्तींचा उपद्रव सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे, घरांचे मोठे नुकसान झाले असून, जनतेच्या सुरक्षिततेवर देखील गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. आता ही समस्या ग्रामीण मर्यादांवर न थांबता थेट गडचिरोली शहरात येऊन ठेपली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास दोन रानटी हत्ती गडचिरोली शहरात शिरले आणि त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, प्रशासन याकडे किती गांभीर्याने पाहतंय, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “गेल्या अनेक वर्षांपासून हत्तींचा उपद्रव जिल्ह्यात सुरू आहे. काँग्रेस पक्षाने वेळोवेळी आंदोलने केली, निवेदने दिली, परंतु सरकारच्या डोळ्यांत अजूनही झोप आहे. हे रानटी हत्ती आता थेट शहरात येऊन म्हणत आहेत की ‘आमचा बंदोबस्त करा’! काय वाट पाहताय मुख्यमंत्री साहेब?”

 

महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सरकारवर आरोप करताना सांगितले की, “गावोगाव शेतकऱ्यांचं जगणं हत्तींच्या भीतीने अस्थिर झालं आहे. माणसांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत, पिकांचं नुकसान झालं आहे, जीवितहानी झाली आहे आणि तरीसुद्धा सरकारला गांभीर्य नसून, गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांनी या समस्येकडे लक्ष द्यावं, हे आमचं नेहमीचं मागणं आहे, पण ते ऐकायला कुणी तयार नाही. हत्तींचा प्रश्न केवळ वन विभागाचा नाही, तर तो जनतेच्या सुरक्षेचा आणि सरकारच्या जबाबदारीचा प्रश्न आहे.”

अशी घटना शहरातच घडल्याने नागरिकांमध्ये चिंता आणि संताप आहे. लोकांना रात्रभर झोप लागलेली नाही, मुलांना घराबाहेर सोडण्याची भीती वाटते आहे आणि व्यापारी वर्ग सुद्धा अस्वस्थ आहे.

“मुख्यमंत्री फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत, त्यांची जबाबदारी आहे की जिल्ह्यातील प्रत्येक समस्येकडे गांभीर्याने पाहावं. परंतु केवळ कार्यक्रमांना उपस्थित राहणं आणि भाषणं देणं याने जनतेच्या समस्या सुटत नाहीत.  ही परिस्थिती रोखण्यासाठी सरकारने आता तरी जागं व्हावं आणि हत्तींच्या कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.

ही घटना वन्यप्राणी संरक्षण आणि मानवी सुरक्षेच्या संतुलनावर गंभीर प्रश्न उपस्थित करते. प्रशासन आणि सरकारने या समस्येला केवळ वनविभागापुरती मर्यादित न ठेवता एक व्यापक धोरण आखायला पाहिजे.

Don`t copy text!