Home Breaking News जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार जाहीर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार जाहीर

130

 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वैकुंठभाई मेहता पुरस्कार जाहीर

 

 

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (GDCC Bank) सन २०२३-२४ साठीचा राज्यस्तरीय कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार जाहीर झाला आहे. दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन, मुंबई यांच्यातर्फे दरवर्षी महाराष्ट्रातील २१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधून एका बँकेची या पुरस्कारासाठी निवड केली जाते, आणि गडचिरोली जिल्हा बँकेने आतापर्यंत १२ वेळा हा पुरस्कार पटकावला आहे, हे विशेष.

 

रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या आर्थिक निकषानुसार उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँकांना कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. सन २०२३-२०२४ चा पुरस्कार गडचिरोली जिल्हा बँकेला जाहीर झाला असून, सदर पुरस्कार वितरण समारंभ लवकरच मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

 

पुरस्कारासाठी निवड करताना प्रामुख्याने सी.आर.ए.आर. (CRAR), एन.पी.ए. (NPA) चे प्रमाण, नफा आणि दर आर्थिक वर्षात होणारी व्यवसाय वृद्धी इत्यादी निकषांवर बँकांची कामगिरी तपासली जाते.

 

दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मागील २९ वर्षांपासून बँकेच्या ५७ शाखांच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील लोकांना बँकिंग सुविधा पुरवत आहे. बँकेने ग्राहकांसाठी मोबाइल बँकिंग, आय.एम.पी.एस. (IMPS) आणि यु.पी.आय. (UPI) अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

 

रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निकषांना पात्र राहून जिल्हा बँकेला नुकतीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंटरनेट बँकिंग सुविधेचा परवानाही दिला आहे. इंटरनेट बँकिंग परवाना प्राप्त झालेली ही महाराष्ट्रातील पहिली आणि देशातील आठवी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठरली आहे, हे बँकेच्या प्रगतीचे एक महत्त्वाचे द्योतक आहे.

 

चंद्रपूर जिल्हा बँकेचे विभाजन होऊन सन १९८५ ला दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना झाली. त्यावेळी बँकेचा एकूण व्यवसाय फक्त ६ कोटींचा होता. बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या दूरदृष्टी आणि मार्गदर्शनामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, गरीब, शेतकरी व दुर्गम भागातील लोकांना बँकिंग सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने शाखांचा विस्तार होऊन आज बँकेच्या ५७ शाखा कार्यरत आहेत. मागील ४० वर्षात बँकेने अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले आहेत.

 

 

Don`t copy text!