*’विदर्भाची काशी – श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर’ माहितीपटाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन*
गडचिरोली, ९ जून: गडचिरोली जिल्ह्याच्या पवित्र आणि पुरातत्त्वीय दृष्ट्या समृद्ध श्रीक्षेत्र मार्कंडेश्वर तीर्थक्षेत्रावर आधारित सहा मिनिटांच्या माहितीपटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच नियोजन भवन येथे विमोचन करण्यात आले. ‘विदर्भाची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक, स्थापत्य व सांस्कृतिक वैशिष्ट्ये या माहितीपटात समाविष्ट आहेत.
अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे, खासदार नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
हा माहितीपट जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आणि जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व माहिती संचालक डॉ गणेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा माहिती कार्यालयामार्फत निर्मिती करण्यात आला आहे.
*माहितीपटाचे मुख्य विषय*
या माहितीपटात वैनगंगा नदीच्या काठी वसलेल्या मार्कंडा मंदिराचे ऐतिहासिक व पुरातत्त्वीय महत्त्व अधोरेखित केले आहे. नागर शैलीतील स्थापत्यकला, शिल्पकला तसेच रामायण-महाभारतकालीन कोरीव कामाचे वर्णन या लघुपटात समाविष्ट आहे.
*धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व*
महाशिवरात्री आणि श्रावण सोमवारला लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आणि वातावरणातील भक्तिरस, तसेच ‘विदर्भाचे खजुराहो’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या कलाकृतींचे चित्रणही माहितीपटात प्रभावीपणे दाखवले आहे. मंदिर परिसरातील निसर्गरम्य वातावरण, कोरीव शिल्पांच्या कथा, स्थापत्यशास्त्रातील बारकावे आणि ऐतिहासिक संदर्भांची जोड देत हा माहितीपट प्रेक्षकांना अध्यात्म आणि संस्कृतीचा समृद्ध अनुभव देतो.
*पर्यटन विकासाला चालना*
या माहितीपटाच्या माध्यमातून श्रीक्षेत्र मार्कंडा मंदिराची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि पर्यटनाच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.