*सुरजागड, झेंडेपार आणि इतर ४२ बेकायदेशीर खाण प्रकल्पांविरोधात – प्रा. अनिल होळी यांचे समस्त जनतेला आवाहन*
*गडचिरोली, १३ जून २०२५ :*
गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या सुरजागड, झेंडेपार आणि इतर ४२ बेकायदेशीर व बळजबरीने सुरू करण्यात येत असलेल्या खाण प्रकल्पांविरोधात जनतेचा रोष उफाळून आला आहे. इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे शिवसेना ( UBT) युवा यांचे द्वारा आयोजित करण्यात आलेल्या प्रकल्प विरोधी एकदिवसीय धरणे आंदोलनात प्रा. अनिल होळी यांनी ठाम भूमिका घेत, या प्रकल्पांचा तीव्र निषेध केला आणि सर्व जनतेला, सामाजिक संघटनांना, ग्रामसभा आणि राजकीय पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले.
या आंदोलनादरम्यान बोलताना प्रा. अनिल होळी यांनी स्पष्टपणे सांगितले की, या प्रकल्पांमुळे आदिवासी समाजाचे जल, जंगल आणि जमीन धोक्यात आले असून हे प्रकल्प पेसा कायदा १९९६ व वनहक्क कायदा २००६ चा सरळ उल्लंघन करत आहेत. या बेकायदेशीर प्रकल्पांमुळे पर्यावरणीय आणि सामाजिक तोटेही मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
या आंदोलनात ग्रामसभा, महाग्रामसभा, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष – कॉंग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी, आजाद समाज पार्टी यांनी या लढ्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि लवकरच आयोजित होणाऱ्या जनआंदोलनात सक्रिय सहभाग देणार असल्याची खात्री दिली आहे.
*विशेषतः सरपंच संघटनांची ठाम भूमिका* या लढ्याला तालुक्यातील सरपंच संघटनांकडून विशेष पाठिंबा मिळत असून, त्यांनी जर प्रशासनाने बेकायदेशीर खाण प्रकल्प त्वरित बंद केले नाहीत, तर सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे.
ही भूमिका लढ्याला एक वेगळेच बळ देणारी आहे. ग्रामपातळीवरचा हा ठाम विरोध प्रशासनाच्या विरोधात एक मजबूत आवाज म्हणून समोर येत आहे.
या एक दिवसीय जन आंदोलनात शिवसेना ( UBT) यांचे विविध पदाधिकारी, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.