*कुरखेडाच्या सती नदीवरील पूलासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ४५ दिवसांचा अल्टीमेटम*
*कुरखेडा तालुक्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि आरोग्य उपाययोजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा*
गडचिरोली, दि. १४ जुलै : कुरखेडा येथे राष्ट्रीय महामार्गावरील सती नदीवरील पुलाची पाहणी करताना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सदर पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला व्हावा, यासाठी ४५ दिवसांची अंतिम मुदत देण्यात येत असल्याचे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना बजावून तातडीने काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी श्री पंडा यांनी आज कुरखेडा तालुक्याला भेट देऊन शासकीय यंत्रणेचा आढावा घेतला व विविध शासकीय प्रकल्प व योजनांची पाहणी केली. यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रशांत गड्डम, तहसीलदार राजकुमार धनबाते तसेच गटविकास अधिकारी, कृषी, आरोग्य व इतर विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण झाले का याबाबत विचारणा करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य, कृषी, बांधकाम आणि इतर सर्व यंत्रणेने तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यासोबतच सातबारा जीवंत मोहिम, धरती आबा शिबिरे व वृक्षलागवड या कार्यक्रमांची कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तहसीलदार धनबाते यांनी कुरखेडा तालुक्यात अतीवृष्टीमुळे ४०७ शेतकऱ्यांचे १५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असल्याचे सांगून नुकसानीच्या पंचनामे प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्यसाचे व पूरग्रस्तांना शासकीय मदतीसाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
*कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट आणि विद्युतीकरणावर तातडीने काम करा*
कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचीही जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. येथील डायलिसिस युनिट त्वरीत सुरू करून गरजू रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबत हिंद लॅब या कार्यकारी संस्थेकडे युनिट सुरू करण्यास होत असलेल्या विलंबाबाबत तक्रार नोंदविण्याचे सांगितले. उपजिल्हा रूग्णालयातील अपूर्ण असलेल्या विद्युतीकरणाचे कामही तात्काळ पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
*मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा*
मान्सून काळात जलसाठे, डबक्यांमुळे मलेरियासारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने आरोग्य विभागाला मलेरिया प्रतिबंधासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले गेले. गावपातळीवर आरोग्य पथकांनी घर ते घर भेटी देऊन तापाचे रुग्ण शोधावेत, रक्त नमुने घ्यावेत व संशयित रुग्णांवर त्वरित उपचार करावेत. पुरप्रवण गावांमध्ये मलेरिया प्रतिबंधक औषधांची फवारणी, साठलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, आणि जनजागृती मोहिमा राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
बैठकीस महसूल, पोलीस, वन, आरोग्य, कृषी तसेच इतर संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.