Home Breaking News ट्रकच्या धडकेत जीपमधील ४ प्रवासी जखमी; एका हवालदाराचाही समावेश

ट्रकच्या धडकेत जीपमधील ४ प्रवासी जखमी; एका हवालदाराचाही समावेश

81

 

ट्रकच्या धडकेत जीपमधील ४ प्रवासी जखमी; एका हवालदाराचाही समावेश

 

कोनसरीजवळ घडला अपघात; जखमींना गडचिरोली आणि चंद्रपूर येथे हलवले

 

आष्टी : आष्टीहून चामोर्शीकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका जीपला लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात जीपमधील चार प्रवासी जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी १.३० वाजता कोनसरीजवळ घडली. जखमींमध्ये एका पोलीस हवालदाराचाही समावेश आहे.

 

पोलीस हवालदार सुदाम खवास (वय ५५, रा. आरमोरी), जीप चालक प्रशांत राजकुमार मेश्राम (वय ३३, रा. चामोर्शी), शिक्षिका कविता किशोर सोनटक्के (वय ५७, रा. गडचिरोली), मारोती गणपती पुंज्ञ्जलवार (वय ७०, रा. आरमोरी) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. हे सर्वजण जीपमधून आष्टीहून चामोर्शीकडे जात असताना लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने (एमएच ४० सीएम-८२९१) त्यांच्या जीपला धडक दिली.

 

जखमींना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जीप चालक प्रशांत मेश्राम यांच्या डोक्यात काचा गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत, तर पोलीस हवालदार सुदाम खवास यांच्या छातीला मार लागला आहे. या दोघांना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शिक्षिका कविता सोनटक्के यांच्या छातीलाही गंभीर मार लागल्याने त्यांना चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

Don`t copy text!