*जारावंडी ग्रामपंचायत विकासापासून वंचित; नाली सफाईच्या अभावामुळे नागरिक त्रस्त*
*एटापल्ली*
जारावंडी ही एटापल्ली तालुक्यातील सर्वात मोठी आणि महसूलदृष्ट्या सक्षम ग्रामपंचायत असूनही, सध्या विकासाच्या दृष्टीने मोठ्या अडचणीत सापडली आहे. जवळपास पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्यामुळे अनेक कामे प्रलंबित आहेत. ग्रामपंचायतीमध्ये केवळ प्रभारी ग्रामसेवक कार्यरत असल्यामुळे नियमित प्रशासनिक कामकाजात अडथळे येत आहेत.
गावातील प्रमुख समस्या म्हणजे नाली सफाईचा अभाव. अनेक ठिकाणी गटारे तुंबलेली असून त्यातील सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्यावर या परिस्थितीचा थेट परिणाम होत आहे.
या समस्येवर वेळेवर उपाययोजना न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या काळात ही परिस्थिती अधिक गंभीर बनत असून सार्वजनिक ठिकाणी देखील सांडपाण्याचा विळखा वाढत आहे. अनेक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही काही ठोस कृती झालेली नाही, ही खेदाची बाब आहे.
ग्रामपंचायतीचे सरपंच आणि प्रभारी ग्रामसेवक यांचे गावाच्या मूलभूत विकासकामांकडे संपूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शासनाकडून विविध योजनांसाठी निधी येत असूनही त्याचा योग्य वापर होत नसल्याचे चित्र आहे. गावातील तरुणांनी आणि नागरिकांनी एकत्र येऊन प्रशासनाकडे याबाबत तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन आणि नियमित ग्रामसेवकाची नियुक्ती या बाबी अत्यंत गरजेच्या आहेत. जारावंडी सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीला योग्य प्रशासन आणि नेतृत्व मिळाल्यास, हे गाव आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाऊ शकते. मात्र सध्या असलेली परिस्थिती पाहता, तात्काळ उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे
*ग्रामपंचायतीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी*
गावातील नाल्यांची सफाई न झाल्यामुळे साचलेल्या पाण्यात डासांची संख्या झपाट्याने वाढत असून मलेरिया, डेंग्यूसारख्या रोगांना बिंग फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या आणि ग्रामपंचायतीच्या गंभीर दुर्लक्षामुळे जनतेचा संताप उफाळून आला आहे. परिणामी, काही नागरिकांनी ग्रामपंचायतीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.






