*जनतेला परतीचा मार्ग द्या!” — चंद्रपूरहून एटापल्लीकडे सायंकाळी ५ वाजता बससेवा सुरू करण्याची भाकपाची मागणी*
एटापल्ली | ६ ऑगस्ट
आरोग्यसेवेचा प्रवास अपूर्ण? चंद्रपूरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्या एटापल्ली तालुक्यातील जनतेला परत येण्यासाठी सायंकाळी कोणतीही एस.टी. सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे उपचारांनंतर लोकांना मुक्काम करावा लागतो, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतो. ही स्थिती बदलण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकपा) सायंकाळी ५ वाजता चंद्रपूरहून एटापल्लीकडे बस सेवा सुरू करण्याची ठाम मागणी केली आहे.
या मागणीसंदर्भात भाकपातर्फे एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की –
सकाळी चंद्रपूरला जाणे शक्य असते. मात्र, डॉक्टरांची तपासणी, रिपोर्ट्स, औषधे आणि औपचारिक प्रक्रिया संध्याकाळी ४-५ वाजता पूर्ण होते. तेव्हा परतीसाठी एकही एस.टी. बस उपलब्ध नसल्याने सामान्य नागरिक अडकल्यासारखे होतात”
ही मागणी पुढे नेत भाकपा जिल्हा सहसचिव व AIYF राज्य उपाध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांनी एस.टी. प्रशासनाला त्वरीत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले.
या मागणीला अनेक संघटनांची साथ मिळाली असून निवेदनावर जुबेदा शेख (आयटक), विजया जम्बोजवार, जयाताई पूडो, शालिनी नैताम, सरिता सोनी, वैशाली वाळके, पार्वती अंगती, राधाबाई गुमलवार, मीना चिंतलवार, माया मंडरे, वर्ण भांडेकर, सुशीला शिवरकर, राजेश्वरी शिवरकर आदी महिला कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
त्याचप्रमाणे भाकपाचे कॉ. विशाल पूजजलवार, कॉ. तेजस गुज्जलवार, कॉ. आकाश तेलकुंटवार, कॉ. सुरज जककुलवार, कॉ. राजेश कोरंटलावार यांचाही सक्रिय सहभाग आहे.
ही बससेवा सुरू झाली, तर ग्रामीण जनतेला वेळेत परतता येईल, अतिरिक्त खर्च वाचेल आणि आरोग्यसेवेनंतर सुरक्षित प्रवास सुनिश्चित होईल,असा विश्वास भाकपातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.






