*महिलांचा इशारा: गाव आमचा आहे, प्रश्नांवर तोडगा निघालाच पाहिजे*!
*नवेगाव (मुरखळा), गडचिरोली*
गावातील अतिक्रमण, अवैध धंदे आणि मोकाट जनावरांच्या प्रश्नांवर ग्रामपंचायतीने तातडीने कारवाई करावी, अन्यथा महिलांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा नवेगाव (मुरखळा) येथील महिलांनी दिला आहे. आज महिलांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतीकडे ठोस मागण्यांचे निवेदन सादर केले आणि ग्रामविकासाच्या प्रश्नांवर आता गप्प बसणार नाही, हे स्पष्ट केले.
महिला काँग्रेस कमिटीच्या सहसचिव कविता उराडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात्मक भेटीत गावातील महिलांनी पुढील पाच प्रमुख मागण्या मांडल्या:
1. रस्त्यांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे
2. अतिक्रमण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
3. शाळेजवळील अवैध व्यवसाय त्वरित बंद करावेत
4. मोकाट जनावरे पकडून त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई करावी
5. पोलीस व जिल्हा परिषद प्रशासनाशी समन्वय साधून स्थायी उपाययोजना कराव्यात
महिलांनी निवेदनात नमूद केलं आहे की, अतिक्रमणामुळे रस्त्यांवरून ये-जा करणे अशक्य झाले आहे. नुकत्याच घडलेल्या अपघातात एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांत संताप आहे. तसेच, शाळेजवळील बिनधास्त सुरू असलेले अवैध धंदे मुलींच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करत असून, शिक्षणाच्या वातावरणालाही बाधा पोहोचवत आहेत. मोकाट जनावरांमुळे अपघात, शेतीचं नुकसान आणि सार्वजनिक आरोग्यावरही धोका वाढला आहे.
*कविता उराडे म्हणाल्या*, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आज गावात अस्वस्थता आहे. महिलांची ही शांतता फार दिवस टिकणार नाही. जर प्रशासनाने वेळेत पावलं उचलली नाहीत, तर गावातील महिलांचं नेतृत्व आता रस्त्यावर उतरेल आणि त्या आंदोलनात संपूर्ण गाव सहभागी होईल.
या निवेदनावर खालील महिलांच्या सह्या आहेत:
उषा गुरनुले, आम्रपाली रामटेके, उत्तरा हजारे, सुनिता गिरडकर, सविता हुड, वर्षा चांदपूरकर, कोमल शेंडे, सपना मांदळे, काजल लाडीलवार, सुनंदा मांदळे, अश्विनी लोणारकर, देवका भावने, अनुसया शेंडे, मायाबाई कनाके, अनिता कन्नाके, वच्छलाबाई शेंडे, सरिता शेंडे, रुखमाबाई शेंडे
*ग्रामपंचायतीसमोर महिलांचा स्पष्ट संदेश*:
आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. प्रश्न तुमचं दुर्लक्ष सोडून मार्ग काढण्याचा आहे.
ग्रामपंचायतीच्या पुढील कृतीकडे आता संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. महिलांनी दाखवलेली एकजूट आणि निर्धार हा गावातील प्रशासनाच्या झोपेची जाग आणणारा ठरला आहे.






