डोंगर-दऱ्यातील भटपारचा आवाज अखेर पोहोचला; रस्त्यासाठीचा सहा दिवसांचा लढा यशस्वी
भामरागड तहसील कार्यालयासमोर भाकपाचे बेमुदत आंदोलन; प्रशासनाकडून रस्त्याच्या कामाबाबत लेखी आश्वासन

भामरागड | प्रतिनिधी
दुर्गम डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेल्या भटपार गावातील रस्त्याच्या प्रलंबित प्रश्नासाठी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकपा) बेमुदत आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले आहे. प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्या मान्य करत जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून रस्त्याच्या कामाबाबत लेखी पत्र दिल्यानंतर सहाव्या दिवशी आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली.
सलग सहा दिवस चालला संघर्ष
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे उलटूनही भटपार गाव मुख्य प्रवाहापासून दूरच राहिले होते. गावाकडे जाण्यासाठी पक्क्या रस्त्याचा अभाव असल्याने ग्रामस्थांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १५ एप्रिल २०२६ पासून भाकपाने जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. रणरणत्या उन्हातही ग्रामस्थांनी आंदोलन सुरू ठेवत आपली मागणी ठामपणे मांडली.
तहसीलदारांनी दिले लेखी आश्वासन
आंदोलनाचा वाढता दबाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने रस्त्याच्या प्रश्नावर सकारात्मक पाऊल उचलले. गडचिरोली जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाला मंजुरी दिल्याचे लेखी पत्र प्रशासनास प्राप्त झाले. भामरागडचे तहसीलदार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन हे पत्र भाकपा पदाधिकारी व ग्रामस्थांना सुपूर्द केले. यानंतर नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
लोकशाही मार्गाचा विजय
या आंदोलनाच्या यशस्वितेसाठी भामरागड पोलीस स्टेशन, स्थानिक प्रशासन, प्रतिष्ठित नागरिक आणि पत्रकारांचे सहकार्य लाभले. लोकशाही मार्गाने लढा दिल्यास न्याय मिळतो, याचा अनुभव भटपार ग्रामस्थांना पुन्हा एकदा आला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
नेतृत्वाची महत्त्वाची भूमिका
या आंदोलनाचे नेतृत्व भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार आणि कॉ. सुरज जककुलवार यांनी केले. आंदोलनात भटपार गावातील महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्त्याच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय झाल्याने ग्रामस्थांनी भाकपा पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून गावाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाल्याची भावना व्यक्त केली.









