आसरेल्ली ग्रामस्थांनी फादरीवर धर्मांतराचा आरोप; पोलीस व ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल
गडचिरोली, सिरोंचा तालुका –
आसरेल्ली गावातील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन आसरेल्ली येथे लेखी तक्रार दाखल केली आहे. पागे कलवारी नावाचा एक ख्रिश्चन फादरी हा गावातील गरीब, अशिक्षित आणि आदिवासी समाजातील लोकांना अंधश्रद्धेच्या माध्यमातून दिशाभूल करून धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या मते, हा फादरी आजारी लोकांना रुग्णालयात पाठविण्याऐवजी आपल्या घरी बोलावून प्रार्थना करवतो आणि या माध्यमातून लोकांची मानसिकता बदलून त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडतो. तक्रारीत म्हटले आहे की अशा प्रकारच्या क्रियाकलापांमुळे आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीय समाजातील लोकांची फसवणूक होऊन धर्मांतर होत आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की यामुळे मूळ आदिवासी बहुल लोकसंख्या घटण्याचा धोका आहे तसेच धर्मांतरित लोक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहू शकतात. तक्रारीत आणखी नमूद केले आहे की दर शुक्रवारी व रविवारी आसरेल्ली गावच्या वार्ड क्रमांक ३ मध्ये हा फादरी आपल्या घरी लोकांना एकत्र करून प्रार्थना करवतो, ज्यामुळे गावात अस्वस्थता व तणावाचे वातावरण निर्माण होत आहे.
या तक्रारीवर गावचे सरपंच रमेश तैनेनी यांच्यासह सांबमजी सोमनपल्ली, विजयकुमार तुमडे, धर्मराज वडलाकोंडा, अजय आकुला, सडवली गुंजे, प्रकाश दामरकुंठा, राकेश चिंताकानी, शिवा गोतुरी, महेश धन्नुरी, मल्लेश पब्बा, रमेश लग्गा, सरोज कोंडेटी, नवीन अल्लुरी, हनमंतु बोर्ला, रोहित धन्नुरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
तक्रारीची प्रत तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक यांनाही पाठविण्यात आली आहे.
पो स्टेशन ला निवेदन देत असतांना आसरेल्ली चे सरपंच श्री रमेश तैनेनी उपस्थित होते.






