एटापल्ली येथे धुरवीरहित चूल व ब्लॅंकेटचे वितरण

126

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने गोटूल सभागृह येथे धुरवीरहित चूल व ब्लॅंकेटचे वितरण

एटापल्ली – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने गोटूल सभागृह, एटापल्ली येथे दिनांक 29/08/2025 रोजी धुरवीरहित चूल तसेच गरजू भगिनींना ब्लॅंकेट वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला माननीय श्री. सुनीलजी मेहेर – प्रांत सेवा प्रमुख, श्री. विकेशजी – जिल्हा प्रचारक, अहेरी, श्री. तुषारजी पवार – तालुका कृषी अधिकारी, श्री. गणेशजी बोडावार – रोल संस्था अहेरी, संस्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय सुंकेपाकवार तसेच संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्लीच्या मुख्याध्यापिका पूजा दासरवार यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे संचालन श्री. अमोल गजाडीवार यांनी केले तर स्वागतगीत संस्कार पब्लिक स्कूलच्या स्वयंसेवकांनी सादर केले.

याशिवाय श्री. विनोदजी पत्तीवार, श्री. उमेशजी चिट्टीवार, गुंडावार सर, गोसू हिचामी, राकेश नरोटे आदी मान्यवरांचीही उपस्थिती लाभली. याकरिता KDM टेलिकॉम सर्व्हिस सोल्युशन प्रा. लि. यांनी विशेष मदत केली.

समारंभात मान्यवरांनी आपल्या भाषणातून ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना आरोग्यदायी पर्याय मिळवून देण्यासाठी धुरवीरहित चुलींचे महत्त्व अधोरेखित केले. गॅसची सुविधा सहज उपलब्ध नसलेल्या अतिदुर्गम भागात या चुली पर्यायी व उपयुक्त ठरतील, स्वयंपाक करताना धूरामुळे होणारे डोळे व श्वसनाचे आजार टळतील तसेच इंधनाची बचत होईल, असे प्रतिपादन करण्यात आले.

त्याचप्रमाणे, थंडीच्या दिवसांत गरजू व स्वच्छताग्रही भगिनींना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. या प्रकल्पामुळे लाभार्थी महिलांना थंडीत उबदारपणासोबतच आरोग्यदायी जीवनमानाचा आधार मिळणार आहे.

या उपक्रमाचा बहुसंख्य दुर्गम व आदिवासी भागातील कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ झाला असून, गावागावांत धुरमुक्त स्वयंपाक व जीवनमानात सकारात्मक बदल होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोल संस्था अहेरी व संस्कार संस्था एटापल्लीचे पदाधिकारी, स्वयंसेवक व स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.