युरियाच्या तुटवड्यात शेतकऱ्यांची लूट कसनसुर येथील दास कृषी केंद्रावर गंभीर आरोप

54
Oplus_131072

एटापल्ली -तालुक्यातील कसनसुर परिसरात आधीच युरिया खताचा तीव्र तुटवडा असताना आज दास कृषी केंद्रावर युरियासोबत शेतकऱ्यांना जबरदस्तीने नॅनो युरिया खरेदी करण्यास भाग पाडल्याचा आरोप होत आहे. एका पिशवीसोबत नॅनो युरिया देत प्रत्येकी ६३० रुपये आकारले जात असून शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शेतकरी दिवसेंदिवस केंद्रावर फिरतोय, कधी रांगेत थांबतोय, पण खत मिळत नाही. आज जेव्हा काही युरिया मिळालं तेव्हा केंद्राने नॅनो युरिया जबरदस्तीने दिलं आणि जास्त पैसे वसूल केले. आधीच संकटात असताना अशा लुटमारीमुळे शेतकरी आणखी अडचणीत सापडले आहोत.

युरिया हे धानाच्या उत्पादनासाठी अत्यावश्यक खत आहे. योग्य वेळी ते न टाकल्यास पिकं करपतात, पाने पिवळसर होतात आणि उत्पादन घटते. आधीच उशीर झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यातच कृषी केंद्रांवरून होणारी लूट शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी ठरत आहे. “शेतकरी संकटात असताना त्याच्याच दु:खावर पैसे कमावण्याचे हे प्रकार अत्यंत निंदनीय आहेत,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

काही शेतकऱ्यांनी थेट सांगितले की, “दोन पिशव्या युरियासाठी आम्हाला १२६० रुपये मोजावे लागले, तेही नॅनो युरियासह. आमच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने खत विकलं जात आहे. जर आम्ही नॅनो घ्यायला नकार दिला, तर साधा युरिया देत नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला पर्यायच उरत नाही.”

कसनसुर येथील दास कृषी केंद्रावरील हा प्रकार उघड झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणींना जबाबदार असलेल्या केंद्रांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. खताचा तुटवडा आणि त्यातच होत असलेली शेतकऱ्यांची लूट थांबविण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक ठरत आहे.

*कृषी अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने च बेकायदेशीर युरिया विक्री?”*

कसनसुर येथे घडलेल्या युरिया विक्री प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून या सर्व प्रकारांमागे संबंधित कृषी अधिकाऱ्यांचे छुपे आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. आदेश नसताना देखील केंद्रचालकाने उघडपणे बेकायदेशीर पद्धतीने युरियाची विक्री केली, त्यात शेतकऱ्यांकडून चढे दर वसूल केले आणि खरेदी केलेल्या युरियावर योग्य व अधिकृत बिल न देता उघड लूट केली. या प्रकरणी शेतकरी व ग्रामस्थांचा आरोप आहे की, कारवाई न करण्यासाठी या कृषी केंद्रांकडून संबंधित अधिकाऱ्यांना ठराविक कमिशन दिले जाते आणि त्यामुळेच अधिकारी सर्व काही माहीत असूनही डोळेझाक करतात. आदेश नसताना एवढी बिनधास्तपणे विक्री करण्याची हिम्मत केंद्रचालकाला कशी काय झाली, हा प्रश्न सर्वत्र चर्चिला जात आहे. शेतकऱ्यांची होत असलेली उघड लूट थांबविण्याऐवजी अधिकाऱ्यांचा मूक पाठिंबा असल्याची चर्चा होत असून, यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल की नेहमीप्रमाणे प्रकरण दाबले जाईल, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

 

_“सदर केंद्रावरील प्रकार अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषींना वाचवले जाणार नाही. चौकशी अहवाल तयार करून वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येईल.”_

*– एच. के. राऊत, तालुका गुण नियंत्रक, एटापल्ली*