अभिव्यक्तीची बीजे कलावंताच्या अवतीभवतीच असतात
-प्राचार्य सदानंद बोरकर
गडचिरोली दि ३०
“कोणत्याही क्षेत्रातील कालवंताला त्याच्या अभिव्यक्तीची बीजे त्याच्या परिसरातच शोधावी लागतात. तसे झाले तरच त्याची कलाकृती मौलिक ठरते”, असे उद्गार झाडीपट्टीतील ज्येष्ठ नाटककार व अभिनेते प्राचार्य सदानंद बोरकर यांनी काढले. चांदाळा येथे झालेल्या साहित्य अकादमीच्या ‘ग्रामालोक’ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. प्राचार्य बोरकर यांनी या प्रसंगी त्यांच्या ‘माझं कुंकू मीच पुसलं’ आणि ‘दोन घरांचे गाव’ या नाटकामागील भीषण वास्तव उलगडून दाखवले. अंधश्रद्धा, सरकारी भ्रष्टाचार आणि शासनाच्या प्रकल्पात विस्थापित झालेल्यांची ससेहोलपट यामुळे सामान्य माणसांचे शोषण मला अवतीभवती दिसले. त्यातून माझ्या नाट्यकृती घडल्या आणि ‘सार्क’ महोत्सवापर्यंत माझे नाटक गेले.
माध्यमिक आश्रमशाळा, चांदाळा आणि साहित्य अकादमीच्या या कार्यक्रमात नाटककार चूडाराम ब्लहारपुरे, कुसुमताई अलाम, विश्वंभर गहाणे आणि संगीता ठलाल हे सहभागी झाले होते. साहित्य अकादमीचे सदस्य डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी भूमिका कथन व प्रास्ताविक केले. प्रारंभी दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य राजाभाऊ मुनघाटे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. गोंडी भाषेतील स्वागतगीताने शाळेतील मुलांनी अतिथींचे स्वागत केले.
ज्येष्ठ नाटककार चूडाराम बल्हारपुरे, यांनी त्यांच्या ‘महामृत्युंजय मार्कंडेश्वर’ या नाटकाच्या निर्मितीमागील प्रेरणा सांगितली. तसेच ५०-६० कलावंत असलेल्या या महानाट्याच्या प्रयोगासाठी घेतलेले कष्ट आणि लोकांचा मिळालेला प्रतिसाद त्यांनी कथन केला. गडचिरोली परिसरातील आदिवासींचे प्रश्न, बुवाबाजी आणि आदिवासी क्रांतिकारक यावर त्यांनी लिहिलेल्या नाटकांचाही त्यांनी आढावा घेतला.
नाट्यलेखक विश्वंभर गहाणे यांनी ‘बिरसा मुंडा’ आणि ‘राणी दुर्गावती’ या त्यांच्या नाटकाविषयी माहिती देऊन ‘मी नाटककार कसा झालो’ हे सांगितले’ आपला परिसर, आपली संस्कृती आणि आपली बोलीभाषा त्यांनी आपल्या नाटकातून कशी अभिव्यक्त केली तेही सांगितले.
कवयित्री कुसुम आलम यांनी आदिवासी कविता सादर करून आदिवासी संस्कृतीमधील देवदेवता, कुलनामे आणि वन्यसृष्टीशी असलेले आदिवासींचे संबंध उघडून दाखवले. तर लेखिका संगीता ठलाल यांनी आपल्या भागातील रानभाज्या आणि वनौषधी या किती मौलिक आहेत हे आपल्या इथल्याच लोकांना माहीत नसते, त्यामुळे पुढील पिढीसाठी हे ज्ञान जतन करण्यासाठी मी सातत्याने रानभाज्यांवर लेखन करीत असते, असे सांगून त्यांनी आपल्या कविताही सादर केल्या.
कार्यक्रमाचे संचालन सतीश पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी यांनी केले. शाळेतील मुलींच्या गोंडी नृत्याने कार्यक्रमाचा असमारोप झाले. डान्स सादर केला
या कार्यक्रमाला दंडकारण्य संस्थेचे सुरेश लडके,वंदना मुनघाटे,स्मिता लडके, संध्या येलेकर, नरेंद्र आरेकर यांच्यासह गडचिरोली परिसरातील नागरिक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
०००
माध्यमिक आश्रमशाळा, चांदाळा
साहित्य अकादमी प्रायोजित कार्यक्रम
|| ग्रामालोक ||
भूमिका कथन : डॉ. प्रमोद मुनघाटे, सदस्य साहित्य अकादमी
अध्यक्ष : प्राचार्य सदानंद बोरकर, झाडीपट्टीभूषण नाट्यकलावंत
सहभाग : श्री. चुडाराम बल्हारपुरे, प्रसिद्ध नाटककार
श्रीमती कुसुम अलाम, प्रसिद्ध आदिवासी कवयित्री
श्रीमती संगीता ठलाल, झाडीपट्टी लेखिका
समारोप : श्रीमती यशोधरा उसेंडी, मुख्याध्यापिका, मा. आश्रमशाळा, चांदाळा
संयोजक : श्री. सतीश पवार, मा. आश्रमशाळा, चांदाळा
००
शनिवार, दि. ३० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता
माध्यमिक आश्रमशाळा, चांदाळा, ता. जि. गडचिरोली