Home Breaking News गडचिरोली पोलीस दलाकडून “एक गाव, एक वाचनालय” उपक्रमांतर्गत मौजा जिजगाव येथे पार...

गडचिरोली पोलीस दलाकडून “एक गाव, एक वाचनालय” उपक्रमांतर्गत मौजा जिजगाव येथे पार पडले ७२ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन व लोकार्पण

93

 

गडचिरोली पोलीस दलाकडून “एक गाव, एक वाचनालय” उपक्रमांतर्गत मौजा जिजगाव येथे पार पडले ७२ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन व लोकार्पण

 

* पोस्टे मन्नेराजाराम हद्दीतील अतिदुर्गम मौजा जिजगाव येथे पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांचे हस्ते करण्यात आले वाचनालयाचे उद्घाटन.

 

* ग्रंथदिंडीत राष्ट्रध्वज फडकवत सहभागी होऊन अतिदुर्गम भागातील विद्यार्थी व नागरिकांनी दिला उत्स्फुर्त प्रतिसाद

 

 

 

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात कार्यरत असलेल्या सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें हद्दीतील शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुष यांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या शिक्षणासह बौद्धिक कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या विचारात बळ यावे तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरीक्षांविषयीची ओढ निर्माण व्हावी या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून “एक गाव, एक वाचनालय” हा उपक्रम सुरु करण्यात आला. या उपक्रमांतर्गत भामरागड उपविभागात पोस्टे मन्नेराजाराम अंतर्गत येणाऱ्या मौजा जिजगाव येथे ७२ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

 

आज दिनांक १३/०९/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री. नीलोत्पल यांच्या हस्ते वरिष्ठ अधिकारी व परिसरातील नागरीकांच्या उपस्थितीत मौजा जिजगाव येथे सर्व सुविधांनी सुसज्ज अशा सार्वजनिक वाचनालयाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला. विशेष बाब म्हणजे गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफ चे अधिकारी व अंमलदार तसेच मौजा जिजगाव परिसरातील नागरिक यांच्या सहकार्याने श्रमदानातून व लोकवर्गणीतून मौजा जिजगाव येथे सुसज्ज व आधुनिक सार्वजनिक वाचनालयाची निर्मीती करण्यात आली आहे. या लोकार्पण सोहळ्यास पोस्टे मन्नेराजाराम हद्दीतील ५०० पेक्षा अधिक संख्येने नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व वरीष्ठ अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सार्वजनिक वाचनालयापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात येऊन त्या माध्यमातून विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये पुस्तक व वाचनाप्रती आवड आणि सन्मान निर्माण होण्यासाठी जनजागृती करण्यात आली. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरुन काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी व स्थानिक नागरीकांनी पारंपारिक वेशभूषा करून व पारंपारिक वाद्य वाजवून राष्ट्रध्वज फडकवत उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. सदर याचनालयामध्ये स्वतंत्र अभ्यासिका, बैठक व्यवस्थेकरीता टेबल, खुर्ची, पुस्तके, पुस्तके ठेवण्याचे कपाट व इतर मुलभुत सुविधांसह सार्वजनिक वाचनालय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या वाचनालयामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थी व नागरिकांना फायदा होऊन स्पर्धा परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. सन २०२३ पासून सुरु करण्यात आलेल्या एक गाव एक वाचनालय उपक्रमाच्या माध्यमातून यापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या ७१ वाचनालयांचा लाभ अतिदुर्गम भागातील ८००० पेक्षा जास्त युवक-युवती व नागरिकांना होत असून या माध्यमातून एकूण २०५ विद्यार्थी शासनाच्या विविध विभांगामध्ये भरती होण्यात यशस्वी झाले आहेत. गडचिरोली पोलीसांकडून राबविण्यात येणार्या प्रभावी नागरिकृती उपक्रमांमुळे मागील तीन वर्षात गडचिरोली जिल्ह्यातून माओवादी संघटनेमध्ये एकही तरुण-तरुणी भरती झालेले नाही.

 

कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हटले की, ‘सदर वाचनालयाचा नागरीकांनी/विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. या वाचनालयातून अनेक विद्यार्थी प्रशासकीय क्षेत्रात यावे व त्यांचे भविष्य उज्वल व्हावे या उद्देशाने वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या भागातील नागरिकांची सुरक्षा व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलीस दल नेहमीच प्रयत्नशील असणार आहे. तसेच गडचिरोली पोलीस दल केवळ माओवादा विरुद्ध लढा देत नसून जिल्ह्यातील नागरिकांच्या सर्वागिण विकासासाठी देखील कटिबद्ध आहे.’

 

सदर उद्घाटन प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, असिस्टंट कमांडंट ए/९ बटा. सीआरपीएफ श्री. अमित सिन्हा, पोस्टे मन्नेराजाराम चे प्रभारी अधिकारी पोउपनि श्री. शुभम शिंदे, एसआरपीएफ ग्रुप ४, नागपूरचे पोउपनि प्रशांत नरखेडे तसेच परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, पत्रकार, शालेय विद्यार्थी व स्थानिक प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

 

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड श्री. अमर मोहिते, पोस्टे मन्नेराजारामचे प्रभारी अधिकारी पोउपनि. शुभम बळवंत शिंदे, पोउपनि, शुभम मिलींद शिंदे, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि चंद्रकांत शेळके व पोस्टे मन्नेराजारामचे अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

Don`t copy text!