गडचिरोली:
श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथून साईबाबांच्या “मुळ चर्मपादुका” समस्त भाविकभक्तांकरीता दुसऱ्यांदा दर्शनासाठी गडचिरोली शहरात मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आगमन होत आहे.
या पवित्र व ऐतिहासिक सोहळ्यासंदर्भात साई मंदिर, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे नियोजन व व्यवस्थापन बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत संस्था प्रतिनिधी आणि श्रद्धावान साईभक्त उपस्थित होते. बैठकीत पादुका आगमनाच्या दिवशी होणाऱ्या स्वागत सोहळा, शोभायात्रा, भजन, कीर्तन, सामूहिक आरती तसेच महाप्रसाद (जेवण) व अन्य धार्मिक कार्यक्रम यांचा सविस्तर आराखडा ठरवण्यात आला.
सर्व उपस्थितांनी या पवित्र सोहळ्यात आपले सहकार्य व सेवा देण्याचे आश्वासन दिले. आयोजकांच्या वतीने सर्व नागरिक व श्रद्धावान साईभक्तांना या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमांत मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवा, सहकार्य आणि भक्तीची संपूर्ण अनुभूती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






