श्राद्ध विशेष लेखांक 13
श्राद्धाचे अन्य प्रकार !
मुख्य प्रकारांव्यतिरिक्त 12 अमावास्या, 4 युगे, 14 मन्वंतरे, 12 संक्रांती, 12 वैधृती, 12 व्यतीपात, 15 महालय, 5 पहिली, 5 अष्टके, 5 अन्वाष्टके, असे श्राद्धाचे ९६ प्रकार सांगितले आहेत. श्राद्धाच्या इतर प्रकारांपैकी काही प्रकारांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे.
अ. गोष्ठीश्राद्ध
ब्राह्मण समुदाय आणि विद्वान एकत्र मिळून तीर्थाच्या ठिकाणी पितरांची तृप्ती व्हावी, तसेच संपत्ती आणि सुख प्राप्त व्हावे, या उद्देशाने श्राद्ध करतात, त्या श्राद्धाला किंवा श्राद्धाविषयी चर्चा होत असतांना एकाएकी स्फूर्ती होऊन जे श्राद्ध केले जाते, त्या श्राद्धाला ‘गोष्ठीश्राद्ध’, असे म्हणतात.
आ. शुद्धीश्राद्ध
आपली शुद्धी होण्यासाठी ब्राह्मणभोजन घालतात, त्याला ‘शुद्धीश्राद्ध’ असे म्हणतात. हे प्रायश्चित्तांग श्राद्ध आहे.
इ. पुष्टीश्राद्ध
शरीरवृद्धी होण्यासाठी आणि द्रव्यादी संपत्तीची वृद्धी होण्यासाठी केलेल्या श्राद्धाला पुष्टीश्राद्ध असे म्हणतात.
ई. घृतश्राद्ध (यात्राश्राद्ध)
तीर्थयात्रेला निघण्यापूर्वी यात्रा निर्विघ्न होण्यासाठी पितरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ घृताने श्राद्ध करतात, याला घृतश्राद्ध असे म्हणतात.
उ. दधीश्राद्ध
तीर्थयात्रेहून परतल्यावर करण्यात येणारे श्राद्ध
ऊ. अष्टकाश्राद्ध (वद्य अष्टमीला करावयाचे श्राद्ध)
अष्टका म्हणजे कोणत्याही मासातील वद्य अष्टमी ही तिथी होय. वेदकाळी अष्टका श्राद्ध हे विशेषतः मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या चार मासांतील वद्य अष्टमीला करत असत. या श्राद्धात भाज्या, मांस, वडे, तीळ, मध, तांदळाची खीर, फळे, कंदमुळे इत्यादी पदार्थ पितरांना अर्पण करत. विश्वेदेव, अग्नि, सूर्य, प्रजापति, रात्री, नक्षत्रे, ऋतू इत्यादी श्राद्धाच्या देवता मानीत.
ए. दैविकश्राद्ध
देवाची कृपा प्राप्त व्हावी, या उद्देशाने केलेल्या श्राद्धाला दैविकश्राद्ध असे म्हणतात.
ऐ. हिरण्यश्राद्ध
भोजन न घालता नुसती दक्षिणा देऊन केलेले श्राद्ध. धान्याचा अभाव असेल, तर धान्याच्या किमतीच्या चौपट किमतीचे सुवर्ण ब्राह्मणांना देऊन हे श्राद्ध करावे.
ओ. हस्तश्राद्ध
श्राद्धीय ब्राह्मणांना भोजन देऊन करण्यात येणारे श्राद्ध. भोजन नसेल, तर हिरण्याने(पैशाने), आमान्नाने (कोरड्या शिध्याने) हे श्राद्ध करतात.
औ. आत्मश्राद्ध
ज्यांना संतती नसते किंवा ज्यांची संतती नास्तिक असते, त्यांनी जिवंतपणी स्वतःचे श्राद्ध स्वतःच करावे. याचा विधी शास्त्रात सांगितला आहे.
अं. चटश्राद्ध
श्राद्धासाठी देव आणि पितर यांच्या स्थानांवर बसण्यासाठी ब्राह्मण उपलब्ध होत नाहीत, तेव्हा त्या स्थानावर दर्भ ठेवतात. त्यास चट (किंवा दर्भबटू) म्हणतात. चट मांडून केलेल्या श्राद्धास चटश्राद्ध म्हणतात. वर श्राद्धाचे विविध प्रकार दिलेले असले, तरी कालमानाप्रमाणे मृत व्यक्तीची ती गेल्यापासून पहिल्या ते अकरा दिवसांपर्यंत करायची श्राद्धे, मासिक श्राद्धे, सपिंडीकरण श्राद्ध, अब्दपूर्तीश्राद्ध, द्वितीयाब्दिक श्राद्ध म्हणजे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध आणि महालयश्राद्ध एवढीच श्राद्धे सर्वसामान्यपणे प्रचलित आहेत.
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्ध’
संकलक : श्रीमती विभा चौधरी
संपर्क क्रमांक :7620831487






