जिल्हा परिषद गडचिरोली व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने “दिवाळी फराळ महोत्सव व विक्री”

32

जिल्हा परिषद गडचिरोली व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने “दिवाळी फराळ महोत्सव व विक्री”

 

 

गडचिरोली, (जिमाका) दि.13 ऑक्टोबर : जिल्हा परिषद गडचिरोली व उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने “दिवाळी फराळ महोत्सव व विक्री” दिनांक 13 ते 21 ऑक्टोबर 2025 दरम्यान जिल्हा परिषद प्रांगणामध्ये आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील विविध स्वयं सहाय्‍यता समूहांनी तयार केलेले पारंपारिक व स्वादिष्ट फराळ, पदार्थ तसेच आकर्षक दिवे, हार फुले, शोभेच्या वस्तू, हस्तकला उत्पादने आणि इतर गृहउपयोगी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे.

दिवाळी फराळ महोत्सव व विक्री जिल्हा परिषद प्रांगणात, पंचायत समिती प्रांगणात, मोठ- मोठयागावामध्ये मोक्याच्या ठिकाणी असे जिल्हयात विवीध ठिकाणी एकूण 120 स्टॉल्स उभारण्यात येणार असून, ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांना त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्रीसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ मिळणार आहे. यामधून महिलांचे आर्थिक सशक्तीकरण व आत्मनिर्भरता साध्य करण्याचा उद्देश आहे. स्वयं सहाय्‍यता समूहांच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या विविध पारंपरिक पदार्थांमध्ये शेव, चिवडा, चकली, तिळ चकली, लाडू, बालुशाही, शंकरपाळे, तसेच पापड, लोणचे, मसाले आणि हस्तनिर्मित वस्तू यांचा समावेश असेल. त्याचबरोबर दिवाळी निमित्त फुलांचे, मातीचे, रंगीत दिवे आणि सजावटीच्या वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध असतील.

जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादकतेला चालना मिळून त्यांच्या व्यवसाय वृद्धीला बळ मिळेल. नागरिकांनी मोठ्या संख्येने फराळ खरेदी करून महिलांना प्रोत्साहन द्यावे, अशी विनंती जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येते.

 

 

“दिवाळी फराळ व वस्तूंची खरेदी करून ग्रामीण महिलांना प्रोत्साहन द्या”

गडचिरोली जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले पदार्थ व वस्तू 13 ते 21 ऑक्टोबर 2025 या कालावधीत जिल्हा परिषद प्रांगणात, पंचायत समिती प्रांगणात, मोठ-मोठयागावामध्ये स्टॉलवर उपलब्ध असतील. नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन महिलांच्या उद्यमशीलतेला हातभार लावावा.

– श्री. सुहास गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली.

 

0000