*जिल्ह्यात 23 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर पर्यंत जमावबंदी*
गडचिरोली, (जिमाका) दि.16 ऑक्टोबर : जिल्ह्यात अनेक राजकीय पक्ष, संघटना व नागरिकांद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे, मोर्चे, आंदोलन, सभा, मिरवणूक किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37(1) व (3) नुसार दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री पासून 06 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे.
या आदेशानुसार शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, लाठ्या, बंदुका किंवा शरीरावर इजा करण्यासाठी वापरता येतील असे इतर कोणतेही उपकरण व दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर ठेवण्याबाबत पूर्ण मनाई आहे. सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती, त्यांच्या प्रतिमा किंवा त्यांच्या दर्शविण्याने समाजात असंतुलन निर्माण करणारे प्रदर्शन, अशोभनीय घोषणाबाजीस मनाई आहे.
जमावबंदीच्या अटींमध्ये सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव, मिरवणूका, मोर्चे किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.
नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.