राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उबाठा), मनसेसोबत मैदानात

255

राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उबाठा), मनसेसोबत मैदानात

बिपाशा भुसारी हे नगराध्यक्षाचे उमेदवार

गडचिरोली, ता. १८ : गडचिरोली नगर परीषदेच्या निवडणुकीत युती, आघाडी धर्म बाजुला करून सोयीची सोबत मिळवली जात आहे. गडचिरोली नगर परीषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या तुतारीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मशालीसोबत आघाडी केली आहे. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी बिपाशा भुसारे यांना देण्यात आली असून त्या राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी मंगळवार (ता. १८) पत्रकार परिषदेतून दिली.

या पत्रकार परीषदेत अतुल गण्यारपवार म्हणाले की, आमच्या आघाडीचे १८ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. काही इच्छूकांना वेळेवर दस्तावेजाची पूर्तता न करता आल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही अन्यथा किमान २१ जागांवर आम्ही उमेदवार उभे केले असते. गडचिरोली शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. तसेच मनसे आणि शिवसेना (उबाठा)चे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने आहेत. हे सर्व कार्यकर्ते उमेदवारांच्या विजयासाठी मेहनत घेणार असल्याचे ते म्हणाले. आघाडीकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ उमेदवार आणि शिवसेना ( उबाठा) पक्षाचे ६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बिपाशा भुसारे या निवडणूक रिंगणातील सर्वांत कमी वयाच्या म्हणजे अवघ्या २२ वर्षांच्या उमेदवार आहेत. त्यांनी पुण्यात उच्च शिक्षण घेतले असून वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. तसेच मूक्या प्राण्यांची, पक्ष्यांची सेवासुश्रूषाही करतात, अशी माहिती गण्यारपवार यांनी दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. संजय ठाकरे, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष वासुदेव शेडमाके, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, राकॉ ओबसी आघाडीचे शेमदेव चाफले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बिपाशा भुसारे, नंदू कुमरे, अमोल गण्यारपवार, एजाज शेख, करण गण्यारपवार, नागनाथ भुसारे, राजेंद्र लांजेवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

———————————-