*ग्रामपंचायतींनी ‘आदर्श गाव योजनेत’ सहभागी होण्याचे आवाहन*

61

*ग्रामपंचायतींनी ‘आदर्श गाव योजनेत’ सहभागी होण्याचे आवाहन*

गडचिरोली दि १९ :- महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाने राज्यातील गावांच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी ‘आदर्शगाव योजना’ अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील होतकरू ग्रामपंचायतींना सहभाग घेण्यासाठी संधी उपलब्ध आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पात्र ग्रामपंचायतींना या महत्त्वाकांक्षी योजनेत सहभागी होऊन आपल्या गावाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

आदर्शगाव योजना ही केवळ पाणलोट विकास किंवा मूलभूत सुविधा पुरवण्यापुरती मर्यादित नसून, ती जल, जमीन, वन, कृषी, रोजगार, शिक्षण, आरोग्य आणि लोकशाही शासन व्यवस्था विकास अशा सर्वसमावेशक घटकांचा एकात्मिक विकास साधून गावे स्वावलंबी व सक्षम बनवण्याची एक अभिनव संकल्पना आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये आणि लाभ:

* एकात्मिक विकास आराखडा: गावाचा विकास आराखडा गाभा कामे (पाणलोट विकास) आणि बिगर गाभा कामे (गाव विकास व मूलभूत सुविधा) अशा दोन भागांमध्ये विभागलेला असेल.

* गाभा कामे: यामध्ये पाणलोट विकास, कृषी विकास, पर्यावरण संवर्धन, क्षमता बांधणी आणि प्रशिक्षणासह, मालमत्ता नसलेल्या व्यक्तींसाठी उपजिविकेचे उपक्रम समाविष्ट आहेत. यासाठी प्रति हेक्टरी ₹१२०००/- चा आर्थिक मापदंड निश्चित केला आहे.

* बिगर गाभा कामे: यामध्ये गावातील अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, समाज मंदिर, सांस्कृतिक सभागृह, शाळा/आरोग्य केंद्र/ग्रामपंचायत इमारतीची सुधारणा, पिण्याच्या पाण्याची सुविधा अशा मूलभूत सुविधांच्या कामांचा अंतर्भाव असेल. यासाठी गाभा कामाच्या मापदंडाच्या २५% पर्यंत निधी उपलब्ध असेल.

* समन्वय: योजनेअंतर्गत शासनाच्या विविध विभागांच्या ग्रामस्तरीय योजनांची अंमलबजावणी गावात समन्वय साधून केली जाईल.

* प्रकल्पाचा कालावधी: निवड झालेल्या गावातील प्रकल्पाचा कालावधी जास्तीत जास्त तीन वर्षांचा असेल.

गावाच्या निवडीची प्रक्रिया:

१. ग्रामसभेची शिफारस: योजनेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतीने सर्वप्रथम ग्रामसभा बोलावून योजनेत सहभागी होण्याचा ठराव पारित करावा.

२. अर्ज सादर करणे: ग्रामसभेने मान्य केलेला अर्ज व आवश्यक कागदपत्रे जिल्हा समितीमार्फत ‘आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती’ (राज्यस्तरीय कार्यकारी समिती) कार्यालयाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करावेत.

३. प्राधान्यक्रम: योजनेत प्रत्येक जिल्ह्याला प्रतिनिधीत्व देत असताना, गडचिरोली जिल्ह्यातून कमीत कमी पाच गावे निवडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आवाहन:

गडचिरोली जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी या योजनेची माहिती घेऊन, गाव पातळीवर चर्चा करून, लवकरात लवकर अर्ज सादर करावा.

अधिक माहितीसाठी संपर्क:- तालुका कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,कार्यालय गडचिरोली.