सरपण गोळा करण्यासाठी गेल्या दोन वृद्ध महिला मात्र वाघाने केले ठार

24

सरपण गोळा करण्यासाठी गेल्या दोन वृद्ध महिला मात्र वाघाने केले ठार

गडचिरोली वृत्तवानी न्यूज
गडचिरोली, ता. २० : आरमोरी तालुक्यातील देऊळगाव बुट्टी येथे एकाच आठवड्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघाने हल्ला करून दोन वृद्ध महिलांना ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुक्ताबाई नेवारे (वय ७०) आणि अनुसया जिंदर वाघ (वय ७०) अशी मृत महिलांची नावे आहेत. दोघीही सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. बुधवार (ता. १९) रात्रीच्या सुमारास एकाच परिसरात दोघींचे मृतदेह आढळून आले. त्यामुळे वडधा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुक्ताबाई नेवारे या बुधवारी सकाळी गावापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. तिथे वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. अनुसया जिंदर वाघ या १२ नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या. बुधवारी रात्री गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गालगतच्या कांडेश्वर पहाडीजवळ दुर्गंधी येत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर परिसरात शोधमोहीम राबवली. रात्री ८ वाजताच्या सुमारास याच ठिकाणी अनुसया जिंदर यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या जवळच मुक्ताबाई नेवारे यांचाही मृतदेह पडून होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. देऊळगावचे पोलिस पाटील मिथून कांदोळ यांनी तत्काळ घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. वाघासह गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींनी घातलेल्या धुमाकूळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शासनाने आवश्यक उपाययोजना करून रानटी हत्ती व हल्लेखोर वाघांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे..
————————————–