*जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू*
गडचिरोली, (जिमाका) दि.24 : नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम व ६ डिसेंबर रोजीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन उत्सव लक्षात घेता तसेच धरणे, मोर्चे वा आंदोलनांची शक्यता विचारात घेऊन गडचिरोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यात जमावबंदी लागू केली आहे.
ही जमावबंदी दि. 22 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्रीपासून ते दि. 06 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37(1)(3) अंतर्गत जारी झालेल्या या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय शस्त्रास्त्रे, दाहक पदार्थ, स्फोटके, दगड-क्षेपणास्त्रे बाळगणे, घोषणाबाजी, उत्तेजनात्मक भाषणे, हावभाव, मिरवणुका, सभा, पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींनी गटागटाने जमणे यास मनाई करण्यात आली आहे.
उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी शिवाय कोणताही सार्वजनिक कार्यक्रम, मोर्चा अथवा मिरवणूक आयोजित करता येणार नाही. आदेशाच्या उल्लंघनावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हादंडाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.




