गडचिरोलीत सर्वांगीण विकासाची ग्वाही; प्रत्येक प्रभागात वाचनालय व जिम उभारण्याचा संकल्प।
प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर)
दिं 25/11/2025
गडचिरोली:गडचिरोली शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भरीव बदलाची ग्वाही देत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी आज शहरातील प्रत्येक प्रभागात सुसज्ज वाचनालय व आधुनिक जिम उभारण्याचा संकल्प केला आहे. युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी नवा ऊर्जापूर्ण दृष्टीकोन मांडत त्यांनी शहराच्या विकासाला नवीन दिशा देण्याची भूमिका स्पष्ट केली.
प्रणोती निंबोरकर म्हणाल्या, “गडचिरोलीच्या प्रत्येक नागरिकाला ज्ञान, आरोग्य व प्रगतीची समान संधी देणे हे माझे ध्येय आहे. प्रत्येक प्रभागात उत्तम वाचनालय आणि आधुनिक उपकरणांनी सुसज्ज जिम स्थापन करून आम्ही शिक्षण, संस्कार आणि फिटनेसला नवी दिशा देऊ.”
त्यांच्या मते, वाचनालयांमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरक वातावरण मिळेल, स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक प्रभावी होईल आणि शहरात वाचनसंस्कृतीचा नवा उन्मेश निर्माण होईल. तर आधुनिक व्यायामशाळांमुळे युवक व महिलांसह सर्व वयोगटातील नागरिकांना आरोग्यपूर्ण जीवनशैली अंगीकारता येईल.
नागरिकांच्या अपेक्षा ओळखत तसेच शहराच्या विकासाला नवा वेग देण्यासाठी ही योजना निर्णायक ठरेल, असा जनतेत सकारात्मक प्रतिसाद उमटत आहे. गडचिरोलीला ज्ञान, संस्कार आणि आरोग्याने समृद्ध करण्याचा संकल्प करत प्रणोती निंबोरकर नगराध्यक्ष म्हणून मतदारांच्या न्यायालयात उभ्या आहेत.





